आमदार प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर बंधू बिनविरोध
12 जागांसाठी 30 उमेदवार
निवडणूक चिन्हांचे झाले वाटप, 27 जुलैला मतदान
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणूक
पुणे : राज्यात सहकार शिक्षण-प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी नऊ संचालकांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर 12 संचालकांच्या जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यासाठी येत्या 27 जुलैला मतदान होणार आहे. दरम्यान, बिनविरोध निवडीमध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व त्यांचे बंधू प्रकाश दरेकर हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळ निवडीसाठी म्हणजे 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. 15) स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 9 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थांच्या वैधानिक कार्यक्षेत्रातील मतदारसंघात जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड मतदारसंघातून विभागनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे. मुंबई विभागातून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, पुणे विभागातून हिरामण सातकर, कोकण विभागातून अरुण पानसरे, छत्रपती संभाजीनगर विभागातून गुलाबराव मगर या चार संचालकांचा समावेश आहे.
तर राज्यस्तरीय संघीय संस्था मतदार संघातून प्रकाश दरेकर, अनुसूचित जाती,जमाती मतदार संघातून विष्णू घुमरे, भटक्या विमुक्ती जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून अनिल गाजरे आणि महिला प्रतिनिधींमध्ये जयश्री पांचाळ, दीपश्री नलवडे या पाच संचालकांचा समावेश आहे.
जल्हा सहकारी बोर्ड मतदार संघातून एक उमेदवार निवडून द्यावयाचा असून 5 मतदार संघात 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये कोल्हापूर विभागाच्या एका जागेसाठी 2 उमेदवार, नाशिकमधून एका जागेेसाठी 4 उमेदवार, लातूरमध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार, अमरावतीमध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार तर नागपूरमध्ये एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. इतर संस्था सभासद मतदार संघातून 5 संचालक निवडून येतात. त्यासाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. विभागीय सहकारी संघातील एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर इतर मागास प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी संबंधित मतदार संघाच्या जागांइतकेच उमेदवारी अर्ज राहिल्याने संंबंधित 9 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उर्वरित 12 जागांसाठी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप बुधवारी (दि.16) केले आहे. निवडणुकीसाठी येत्या 27 जुलै रोजी मतदान होणार आहे.प्रकाश जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे.