वेतनाअभावी उपासमारीची वेळ Pudhari
पुणे

रुग्णवाहिकाचालकांंवर उपासमारीची वेळ

पुढारी वृत्तसेवा

दत्तात्रय नलावडे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाचालकांसह कंत्राटी कर्मचार्‍यांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटदारांकडून मिळणारे तुटपुंजे वेतन 9 महिन्यांपासून रखडले आहे. तर दुसरीकडे. कंत्राटी चालक, कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी निधी नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन हतबल झाले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळविण्यात आल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने गंभीर चित्र पुढे आले आहे. खेड्यापाड्यासह उपनगरी गावातील आरोग्य सेवेचा मुख्य कणा म्हणून 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सज्ज आहेत. मात्र, रुग्णवाहिकाचालकांना दरमहा कंत्राटदारांकडून मिळणारे तुटपुंजे 10 हजार 500 रुपयांचे वेतन गेल्या डिसेंबर महिन्यापासून मिळाले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकाचालक, आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कर्मचारी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून जिल्हा परिषदेला कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी वेळेवर निधी दिला जात नाही. त्यामुळे गेल्या आठ, दहा वर्षांपासून वारंवार निधीअभावी कंत्राटी चालक, कर्मचार्‍यांना वेतन मिळत नाही.

आज वेतन मिळेल या आशेवर 9 महिन्यांपासून दररोज वाट पाहात आहे. उसनेही पैसे कोणी देत नाही आणि खिशात पैसा नाही. दुसरी नोकरी मिळत नसल्याने कामही सोडता येत नाही.
चेतन शिनगारे, रुग्णवाहिकाचालक, प्राथमिक आरोग्य केंद्र, खानापूर
रुग्णवाहिकाचालक व कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने वाहनचालक व सफाई कर्मचार्‍यांना वेतन दिले नाही.
महेश वाघमारे, आरोग्य विस्तार अधिकारी, हवेली तालुका पंचायत समिती

आरोग्य विभाग तक्रारीची दखल घेईना

जिल्हा कंत्राटी वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष काळुराम सस्ते, सोमनाथ सरोदे व चालक गेल्या आठ महिन्यांपासून या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी पाठपुरावा करत आहेत. याबाबत सरोदे म्हणाले की, ठेकेदाराने गेल्या 9 महिन्यांपासून कर्मचार्‍यांना वेतन दिले नाही. तसेच पीएफ व इतर सुविधाही दोन वर्षांपासून मिळत नाहीत. याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT