पुणे

कुदळवाडीतील बालकांना गोवरचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिखलीतील कुदळवाडी या गोवर उद्रेक असलेल्या भागात 1 हजार 600 घरांचा समावेश आहे. तेथील पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना प्राधान्याने बूस्टर डोस देण्यात येत आहे. एका दिवसात 320 डोस देण्यात आले आहेत. तर, कुदळवाडीप्रमाणे शहरात गोवर उद्रेक असलेली इतर ठिकाणे नाहीत, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.30) सांगितले.
कुदळवाडीतील 1 ते 4 वयोगटांतील 2 आणि 5 ते 10 वयोगटांतील 3 बालकांना गोवर आजार झाल्याचे मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटच्या अहवालावरून मंगळवारी (दि. 29) निर्देशनास आले. ती सर्व बालके कुदळवाडी परिसरातील असल्याने तो भाग गोवर उद्रेक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, गोवर असलेल्या पाच बालकांमध्ये 4 मुली व 1 मुलगा आहे. ते नुकतेच प्रवास करून आले असून, ते कुदळवाडीत वास्तव्यास आहेत. त्या भागांत सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना प्राधान्याने बुस्टर डोस देण्यात येत आहे. ज्या बालकांचे लसीकणर झाले नाही, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. पालिकेचे रूग्णालय व दवाखान्यात सकाळी 9.30 ते दुुपारी 3.30 या वेळेत लसीकरण केले जात आहे.
पाल्यास गोवर आजाराची लक्षण असल्यास तत्काळ जवळच्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. तसेच, पालिका व खासगी अशा सर्व शाळा आणि बालवाड्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

चार रुग्णालयांत उपचार स्वतंत्र कक्ष
दक्षता म्हणून महापालिकेच्या विविध रुग्णालयांत गोवर रुग्ण बालकांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. आकुर्डी रुग्णालयात 10, जिजामाता रूग्णालयात 10, थेरगाव रुग्णालयात 5 आणि भोसरी रुग्णालयात 5 बेड आहेत. तर, वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित केला आहे.

SCROLL FOR NEXT