पुणे

पुणे : आयटीआयमध्ये एव्हिएशन कोर्स सुरू करा; कौशल्य विकास मंत्र्यांंची अधिकार्‍यांना सूचना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एव्हिएशन क्षेत्रात सध्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्युपमेन्ट फिटर हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात यावा, अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन दसॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या अभ्यासक्रमाची पाहणी केली. फ्रान्स येथील प्रशिक्षक, तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

देशात हा अभ्यासक्रम नागपूर येथे सुरू आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता फ्रान्स सरकारने यंत्रसामग्री, प्रशिक्षक, टुल्स व कच्चा माल इत्यादी उपलब्ध करून दिले आहेत. यासंदर्भात लोढा म्हणाले, एव्हिएशन क्षेत्रात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम जास्तीतजास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल.

जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण
देशाबाहेर रोजगाराच्या संधी असल्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसोबतच फ्रेंच, जपानी व जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना परदेशातही रोजगार मिळण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे. यासाठी विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भाषातज्ज्ञांचे ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत मदत घेता येईल, याची तपासणी करावी, अशा सूचना लोढा यांनी दिल्या आहेत.

SCROLL FOR NEXT