Pudhari
पुणे

एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे ठरतेय त्रासदायक

प्रवासात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले; पुणे-सातारा महामार्गावर प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

माणिक पवार

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब—ीदवाक्य असले, तरी सध्याच्या अनेक एसटी बसप्रवाशांना सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचे रोजचे चित्र आहे. स्वारगेट, सातारा, सांगली, कोल्हापूर या आगारांचे काम अनेक जुन्या बसवर चालू असल्याने पुणे-सातारा महामार्गावर अचानक बस नादुरुस्त होऊन प्रवाशांचा वेळ खर्ची होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे महामंडळ लक्ष देणार आहे का? असा सवाल संतप्त प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.

जाणकारांच्या मतानुसार 10 लाख किलोमीटर किंवा 10 वर्षे असे निकष असताना अनेक एसटी बस 15 लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावल्या आहेत. तसेच, 15 वर्षांहून अधिक जुन्या अगदी खिळखिळ्या झालेल्या बस अजूनही रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर तसेच अन्य राज्यमार्गांवर या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे.

स्टेअरिंगमध्ये बिघाड होणे, गिअर अडकणे, रेडिएटर फुटणे, इंजिन ओव्हर हीट होणे, टायर फुटणे, स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने बसला धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट तुटणे आदी प्रकार नेहमीचेच झाले आहेत. तर, अंतर्गत भागातही बसचे सीट तुटलेले, गाद्या फाटलेल्या असणे, खिडक्या फुटणे किंवा नसणे, पत्रा तुटलेला असणे तसेच बसचा आवाजही प्रवाशाच्या कानाला सहन होणार नाही इतका असणे, अशा समस्या जुन्या बसमध्ये असतात. अनेकदा लांब पल्ल्यासाठी याच जुन्या बस वापरल्या जात आहेत. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

बुधवारी (दि. 8) सांगली आगारातून निघालेली सांगली-स्वारगेट बस ही पुणे-सातारा महामार्गावर खुटवडवस्ती (ता. भोर) येथे टायर पंक्चर झाल्याने थांबली होती, तर दुसर्‍या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी, या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना मिळेल त्या बसमधून पुढील प्रवास करावा लागला. हे रोजचे चित्र असल्याचे महामार्ग पट्ट्यातील हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत. नादुरुस्त बसमुळे वेळेत प्रवास होत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानाबरोबर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे प्रवासी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

काही दिवसांपासून स्वारगेट (पुणे) आगारातून वेल्हेकडे जाणार्‍या बस देखील वारंवार बंद पडल्याच्या घटना आहेत. स्वारगेटवरून आलेली बस नसरापूरमध्ये गिअर टाकण्यास अडथळे येऊ लागल्याने चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवून माळेगाव येथे पेट्रोल पंपाजवळ कशीबशी नेली. त्यानंतर पुन्हा दुसरी बस मागवली. मात्र, तिचीही स्थिती फारशी समाधानकारक नव्हतीच. या वेळी दुर्गम भागात जाणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. याबाबत स्वारगेट आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

चालक-वाहकांनाही त्रास

मागील एक वर्षादरम्यान एसटी महामंडळाने नवीन योजना आणल्या. याला प्रवाशांसह महिलावर्गाने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आगारातून निघणार्‍या बस सुस्थितीत आहेत का? याची शहनिशा होण्याची गरज आहे. नादुरुस्त बसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT