पुणे

Pune news : ’लालपरी’च्या मार्गदर्शक पाट्याच गायब; प्रवाशांचा उडतोय गोंधळ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट स्थानकात प्रवाशांची वाहतूक करणार्‍या अनेक बसगाड्यांना मार्ग दर्शविणार्‍या पाट्याच नसल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा गोंधळ उडत असून, नक्की कोणत्या गाडीत बसावे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. एसटीच्या स्वारगेट आगारातून राज्यभरात प्रवासी वाहतूक होत असते. त्याद्वारे लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. मात्र, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नेहमी प्रवाशांना फटका बसत असतो.

मागे पावसाळ्यात येथे तर अक्षरश: पाण्याचे तळेच साचले होते. त्यातून वाट काढताना प्रवाशांच्या नाकीनऊ आले. त्यानंतर प्रवाशांना अनेकदा तिकीट रिझर्वेशन सर्व्हर डाऊन, वेळेत गाड्या उपलब्ध न होणे, स्थानकातील खड्डे, येथील अस्वच्छता यांचा सामना करावा लागतो. आता तर एसटीच्या काही गाड्यांना पाट्या नसल्यामुळे प्रवाशांचा पुरता गोंधळ उडत आहे.

स्वारगेट स्थानकावर आल्यावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या समस्यांचा आम्हाला सामना करावा लागतो. खड्डे, दुर्गंधी, बेवड्यांचा येथे त्रास होतो. आता तर येथील गाड्यांना मार्गाचे नाव दाखविणार्‍या पाट्याच दिसत नाहीत. मग आम्ही कोणत्या गाडीने जायचे, ते आम्हाला कसे समजणार?

– श्रेयस शेडगे, प्रवासी.

स्वारगेट आगाराच्या सर्व गाड्यांना मार्ग दर्शविणार्‍या पाट्या लावण्यात आलेल्या असतात. इतर आगाराच्या गाड्यांना मार्ग दर्शविणार्‍या पाट्या नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्या सर्व आगाराच्या गाड्यांना पाट्या लावण्याच्या सूचना करण्यात येतील.

– भूषण सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक, स्वारगेट.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT