पुणे : पुढारी वृत्तसेवा : झणझणीत अन् तर्रीबाज मिसळीवर ताव मारणारी तरुणाई… पोटभर मिसळ अन् ताकाचा घोट घेतल्यानंतर खवय्यांच्या चेहर्यावर उमटलेले समाधान अन् चोखंदळ पुणेकर खवय्यांचे स्टॉलधारकांनी केलेले आदरातिथ्य… असे उत्साही वातावरण शनिवारी ऑक्सिरीच प्रस्तुत 'दै. पुढारी महामिसळ महोत्सवा'त पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. पुणे असो कोल्हापूर… मुंबई असो वा नाशिक… विविध ठिकाणच्या चविष्ट मिसळ खवय्यांना खायला मिळाल्या. गरमागरम मिसळीचा आनंद लुटण्यासाठी खवय्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
'पुढारी महामिसळ महोत्सवा'चे उद्घाटन बिसबॉस मराठीफेम सेलिबि—टी शेफ पराग कान्हेरे, पुढारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव आणि पुनीत बालन समूहाचे चेअरमन आणि एमडी पुनीत बालन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सुरुचि स्पाईसेसचे सुरेश डिंगर, नंदन दूधचे अजय मुरकुटे, चितळे बंधू मिठाईवालेचे आदित्य कराडकर आदी उपस्थित होते.
पराग कान्हेरे यांनी मिसळबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कान्हेरे म्हणाले की, महोत्सवात एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ असल्याने खवय्यांना नक्कीच मिसळ खाण्याची पर्वणीच 'पुढारी'ने उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रात आपण कुठेही प्रवास करतो तेव्हा मिसळची चव बदलते. मसाला बनविण्याची पद्धत, रस्सा बनविण्याची पद्धत वेगळी असते. त्यात आता विविध शेफच्या इनोव्हेशनची भर पडली आहे.
'पुढारी कस्तुरी क्लब'तर्फे मिसळसोबत पुणेकरांनी सुरेल गीतांची मैफलही अनुभवली. गायक सचिन सोनटक्के आणि गायिका ललिता जगदाळे यांनी बहारदार गीते सादर केली. महोत्सवाला सिने-नाट्यसृष्टीतील कलावंतांनीही भेट दिली. सोनी मराठी वाहिनीवरील 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'फेम कलाकार अमृता पवार, निषाद भोईर आणि सुरेखा कुडची हेही महोत्सवात सहभागी झाले. रविवारी (दि. 26) खवय्यांना सकाळी साडेआठ ते रात्री नऊ या वेळेत महोत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे. डी. पी. रस्त्यावरील सृष्टी गार्डन येथे महोत्सव होत आहे. महोत्सवात रविवारी सायंकाळी सहा वाजता सोनी मराठी वाहिनीवरील 'प्रतिशोध : झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील अमोल बावडेकर, पायल मेमाणे, तर 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'फेम चेतना भट, वनिता खरात आणि श्याम रजपूत हे कलाकार भेट देणार आहेत.
पुणेकर खवय्यांना खाण्याची खूप आवड आहे, त्यात मिसळ तर पुणेकरांचा आवडता पदार्थ असून, यंदा दोन दिवस आयोजित केलेला हा महोत्सव पुढील वर्षी तीन दिवस आयोजित करावा, असे मला वाटते. वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळ खवय्यांना खायला मिळत असल्याने खवय्यांनी नक्कीच महोत्सवाला भेट द्यावी.
– पुनीत बालन,चेअरमन आणि एमडी, पुनीत बालन समूह
विविध प्रकारच्या मिसळ एकाच छताखाली मिळाल्याने खवय्यांना एक पर्वणी अनुभवता येत आहे. येथे अनेक नवीन स्टॉर्टअप पाहायला मिळाले, हे पाहून खूप चांगले वाटले. मराठी खाद्यसंस्कृतीला 'पुढारी' वाव देत आहे. मिसळ म्हणजे 'पुढारी'ची ओळख बनली आहे.
– डॉ. संजय चोरडिया, संस्थापक-अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट