तळेगाव दाभाडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मान्सून लवकरच दाखल होणार या आशेमुळे मावळ तालुक्यातील खरीप भातपिक उत्पादक शेतकर्यांनी भात पिकाच्या पेरणीपूर्वीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. जलसिंचनाची सुविधा असणार्या काही शेतकरी बांधवानी भात पिकाच्या पेरण्या सुरूदेखील केल्या आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात पिकाचे उत्पादन घेणारा महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे तेरा हजार हेक्टर जमिनीवर भातपिक घेतले जाते. मान्सूनच्या पावसाचे प्रमाण या तालुक्यात सर्वांत जास्त आहे. दरवर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. तत्पूर्वी प्रत्येक शेतकरी हा भात पिकांच्या पेरणीपूर्वीच्या मशागती करीत असतो. आतापर्यंत बहुतेक शेतक-यांनी आपल्या शेतीची कामे उरकलेली आहेत. आता शेतकरी हा केवळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे.
मावळ तालुक्यात इंद्रायणी भात पिकाचे प्रमाण जास्त आहे. गेल्यावर्षी मावळ अॅग्रो या स्वयंसेवी संस्थेने हमी भावपेक्षा जास्त दर दिला होता. त्यामुळे शेतकरीबांधव समाधानी होते. यावर्षी पावसाचे आगमन हे जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी यासाठी सज्ज झाले आहेत.
बी-बियाणे, खते याची जमवाजमव करून ठेवलेली आहे. सध्या इंद्रायणी भात बियाणे हे 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. खरीप भात पिकाबाबत मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ व अन्य कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत.