राज्यातील दस्त नोंदणीला येणार वेग File Photo
पुणे

राज्यातील दस्त नोंदणीला येणार वेग

दुय्यम निबंधकांच्या भरतीने कारभार होणार गतिमान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील दस्त नोंदणीच्या कामाला वेग येणार असून, खरेदीखते, करारनामे, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, गहाणखत इत्यादींसह विविध प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी दिवस दिवस ताटकळत बसणार्‍या नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सुमारे पावणे दोनशे रिक्त जागांपैकी 126 जागा शासनाने भरल्याने हा सकारात्मक परिणाम झाला आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात गेल्या काही वर्षांत रिक्त झालेल्या दुय्यम निबंधकांच्या पावणेदोनशेहून अधिक रिक्त जागांपैकी सुमारे 126 जागा शासनाने गेल्या वर्षी भरल्या. सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या या नव्या दमाच्या दुय्यम निबंधकांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आता शहरातील विविध सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांबरोबर त्यांनीही कामाला सुरुवात केली आहे.

नोंदणी विभागात दाखल झालेली दुय्यम निबंधकांची ही नवी फळी तंत्रकुशल असल्याने त्यांच्या कामाचा वेग व झपाटा वाखणण्याजोगा आहे. त्यामुळेच ते पूर्ण क्षमतेने काम करू लागतील तेव्हा कामाचा निपटारा वेगाने होईल असा विश्वास नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी व्यक्त केला.

कार्यालय होणार गतिमान

दस्त नोंदणी कार्यालयात प्रामुख्याने खरेदीखत, करारनाम्यांबरोबरच भाडेपट्टा, डेव्हलपमेंट अ‍ॅग्रिमेंट, असाइनमेंट, मॉरगेज, साठे खत, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी इत्यादी दस्तांची नोंदणी केली जाते. मालमत्तेचे मूल्यांकन ठरविण्याचे महत्त्वाचे कामही याच कार्यालयाला करावे लागते. त्या आधारेच स्टॅम्प आकारणीची रक्कम निश्चित केली जाते.

मूल्यांकन करताना जमिनीचा, मालमत्तेचा सात बारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड बारकाईने पाहावी लागतात. त्या जमिनीचा पीक-पाणी-पेरा पाहून जमीन जिराईत, बागायत आहे की हंगामी बागायत आहे हेही पाहावे लागते. तसेच ती हमरस्त्यालगत आहे की गावठाणात आहे यावरूनही तिचे मूल्यांकन निश्चित होत असते.

नव्याने रुजू झालेले प्रशिक्षणार्थी दुय्यम निबंधक सध्या शहरातील विविध सह दुय्यम निबंधक कार्यालयांमधून या बाबतची माहिती घेत असून, दररोज दाखल नोंदल्या जाणार्‍या दस्तांचाही अभ्यास करीत आहेत.

एप्रिलमध्ये होणार चाचणी

सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात या दुय्यम निबंधकांनी नोंदणीविषयक नियमांची उजळणी केली. दुय्यम निबंधक म्हणून काम करताना होणार्‍या चुका, त्या होऊ नयेत म्हणून घ्यावयाची खबरदारी याबाबत हिंगाणे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या नव्या दुय्यम निबंधकांना स्टॅम्प अ‍ॅक्ट समजला आहे का, याचीही चाचपणी केली. या सर्व प्रशिक्षणार्थींची येत्या एप्रिलमध्ये खात्यांतर्गत चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर ते राज्यातील विविध ठिकाणी दुय्यम निबंधक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून आमचे तांत्रिक प्रशिक्षण सुरू आहे. दस्त कसे तपासायचे, ते तपासताना कोणत्या मुद्द्यांवर भर असायला हवा. मूल्यांकन कसे तपासायचे, मंथली स्टेटमेंट कसे करायचे, दस्त नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांशी कसा संवाद साधायचा याचा अनुभव या तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत आम्हाला मिळाला. त्यामुळे कोणत्या प्रकारचे दस्त कसे तपासायचे, मूल्यांकन चुकले असले तर काय करायचे अशा बारीकसारीक गोष्टीही समजल्या. या अनुभवाआधारे आम्ही आमचे काम जलद व बिनचूक करू शकू.
- आरती नागरगोजे (प्रशिक्षणार्थी, दुय्यम निबंधक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT