पुणे

पिंपरी : कलावंतांच्या दिलखेचक अदांवर प्रेक्षक फिदा

अमृता चौगुले

पिंपरी : 'खेळताना रंग बाई होळीचा', 'इचार काय हाय तुमचा, पाहुणं इचार काय हाय' 'या रावजी, बसा भावजी' अशा एकापेक्षा एक वरचढ लावण्या सादर करत शिट्ट्या, टाळ्यांची दाद मिळवित प्रेक्षागृहात लावणीचे रंग भरले. लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपरिक लावणी जपण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने दोन दिवसीय लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवास शनिवारी (दि.25) महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. पं.नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी लावणीसम्राज्ञी आणि परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांच्यासह आमदार उमा खापरे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शैला मोळक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.

'मी राजसा तुम्हासाठी' या संघाने पहिल्या लावणीचे सादरीकरण केले. लांवण्यवतींनी पारंपरिक लावण्या सादर केल्या, अदाकारी सादर केल्या. नखशिखांत सजलेल्या नृत्यगंनांनी लावण्या सादर करत महिलांची मने जिंकली. रजनी पाटील पुणेकर, सोनाली जळगावकर, दीप्ती आहेर यांनी लावणी सादर केली. परीक्षक सुरेखा पुणेकर यांनीही नृत्य केले. श्रृती मुंबईकर यांनी 'आशिक माशुक', उर्मिला धुरत यांनी 'कारभारी जरा दमानं' ही लावणी सादर करत दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर केले. जय मल्हार कला नाट्य मडळाच्या संघानेही विविध लावण्या सादर केल्या. प्रतिमा चव्हाण आणि नरेंद्र आंबे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रेक्षक महिलांनी धरला नृत्याचा ठेका
लावणी महोत्सवात पारंपरिक पद्धतीने लावण्यांचे सादरीकरण झाले. एकापेक्षा एक सरस लावण्यांचे सादरीकरण झाले. महिलांनी जागेवर उभे राहून लावण्यांना दाद दिली. नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. टाळ्या, शिट्या वाजविल्या. पारंपरिक वेशभूषेत, नऊवारी, फेटे परिधान करुन महिला आल्या होत्या. काही लावण्यांना 'वन्समोअर'ही झाला. प्रेक्षकातील काही महिला व तरुणींनादेखील स्टेजवर लावणी करण्याची संधी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT