पुणे

Ashadhi Wari 2023 : यवत येथे हजार किलो पिठलं अन् 60 हजार भाकरी ; वारकर्‍यांच्या भोजनाची खास व्यवस्था

अमृता चौगुले

यवत : पुढारी वृत्तसेवा : यवत येथे वारकर्‍यांच्या भोजनासाठी हजार किलोचे पिठलं आणि 60 हजार भाकरीचा बेत करण्यात आला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. 15) यवत मुक्कामी असल्याने ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पिठलं-भाकरीची मेजवानी करण्यात आली आहे. यवतमधील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार्‍या कालभैरवनाथ मंदिरामधील स्वयंपाक गृहात गुरुवारी दिवसभर ही लगबग सुरू होती. या ठिकाणी सुमारे एक हजार किलो पिठलं आणि 60 हजार भाकरी व 20 हजार चपाती दरवर्षी बनवल्या जातात. यातील 350 किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी मंदिराच्या स्वयंपाकगृहात महिलांकडून बनविल्या जातात. यासह घरोघरी भाकरी बनवून मंदिरात जमा होणार्‍या भाकरींची संख्या मोठी असते. वारीतील सुमारे एक लाख वारकर्‍यांना पुरेल इतके जेवण बनवले जाते.

यवतमधील पिठलं-भाकरीची चवच न्यारी असल्याचा अनुभव सर्वच वारकऱ्यांना असल्याने या ठिकाणी भोजनासाठी मोठी गर्दी होत असते. पिठलं-भाकरी खाण्यासाठी या ठिकाणी सरकारी अधिकारी व पालखी सोहळा काळात नेमणुकीला असलेले कर्मचारीदेखील पसंती देतात. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील पिठलं-भाकरी बनविण्यात येत असलेल्या स्वयंपाकगृहात उपस्थित राहत भाकरी भाजण्याचा आनंद घेतला.

तरुणांचा उत्साह अन् ज्येष्ठांचे मार्गदर्शन
तब्बल 14 ते 15 कढ्यांमध्ये पिठलं बनवले जाते. गावातील तरुण मंडळी यासाठी मेहनत घेतात, तर ज्येष्ठ मार्गदर्शन करतात. सायंकाळी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण वाढण्याचे काम केले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT