पुणे: शहरातील अवैध स्पा सेंटरबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली असून, रहिवासी इमारतींमधील स्पा सेंटर तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने कोरेगाव पार्क परिसरातील रहिवासी इमारतींमध्ये स्पा सेंटर सुरू असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी पोलीस आयुक्तांकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी गुरुवारी (दि. 16) सायंकाळी कोरेगाव पार्क परिसरात भेट दिली.
या वेळी त्यांनी रस्त्यावर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, भविष्यात रहिवासी इमारतींत स्पा सेंटर आढळले, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे.
या वेळी अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव पार्क परिसर हा पुण्यातील उच्चभ्रू परिसरांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या परिसरात अधिकृत, अनधिकृत स्पा सेंटरचा मोठा प्रश्न आहे. या परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, फुटपाथवरील अतिक्रमण, वाहतुकीची समस्या, रात्री उशिरापर्यंत चालणारा दणदणाट, तर काही हॉटेल व्यावसायकांनी फुटपाथवर टेबल-खुर्च्या टाकून रस्ता अडविला होता. पादचार्यांना या समस्यांचा सामना करावा लागत होता.
यासंबंधींच्या तक्रारी पोलीस आयुक्तांपर्यंत नागरिकांनी पोहचवल्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: कोरेगाव पार्क येथील 4 ते 5 लेन फिरून आढावा घेतला. या वेळी उपस्थित पोलीस अधिकार्यांना त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेणार नाही, जे अवैध धंदे सुरू आहेत, ते तत्काळ बंद करा, अशा सूचना दिल्या. या वेळी आयुक्तांनी विशेषत: स्पा सेंटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
गुरुवारी संध्याकाळी अचानक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह रस्त्यावर उतरले. त्यांनी नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला. यानंतर यासंबंधी कडक भूमिका घेण्याचे धोरण पोलिस आयुक्तांनी ठरवले. त्याचबरोबर अन्य कोणते अवैध धंदे या परिसरात सुरू आहेत, याची पडताळणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कोरेगाव पार्कच्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
कोरेगाव पार्क पोलिसांच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची पोलीस आयुक्तांनी बुधवारी वाहतूक शाखेत उचलबांगडी केली. आता कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनील थोपटे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसांपासून कोरेगाव पार्कमधील नागरिक त्यांच्या समस्यांचा पाढा पोलीस निरीक्षकांकडे वाचत होते.
मात्र, थेट या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत, गुरुवारी संध्याकाळी स्वत: कोरेगाव पार्कमधील रस्त्यावर उतरत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, रुणाल मुल्ला यांची बदली याच कारणामुळे झाली का? अशी शक्यता देखील आता वर्तवली जात आहे.