पेठ : पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात रविवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने पेठ, कारेगाव परिसरात अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वार्यामुळे पूर्ण वाढ झालेले ज्वारी पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बटाटा, कांदा, हरभरा या पिकांसाठी हा पाऊस जरी उपयुक्त ठरला असला तरी उंच वाढलेली ज्वारीची ताटे प्रचंड वारे वाहत असल्याने भुईसपाट झाली. पर्यायाने ज्वारी दाणे उत्पादन घटणार असून अवकाळी पावसाने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे, अशी माहिती पेठ येथील शेतकरी शिवाजी पवळे, भावडी येथील शेतकरी सोपानराव नवले, कारेगाव येथील पोलिस पाटील विशाल कराळे यांनी सांगितले.
जिरायत भागातील ज्वारी पिकास हा पाऊस अनुकूल झाला आहे; मात्र मोठे वाढलेली ज्वारी पीक मात्र जोरदार वारे,पाऊस , गारा यांनी भुईसपाट झाले आहे. कुरवंडी भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. येथील कांदा पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे, अशी माहिती आकाश तोत्रे यांनी दिली. पेठ भागात वादळ आल्याने ज्वारी पीक पूर्ण भुईसपाट झाले, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे व श्री वाकेर्श्वर दूध डेअरीचे अध्यक्ष बाबाजी ढमाले यांनी दिली. कोल्हारवाडी, थुगाव, कारेगाव भागात ज्वारी पिकापेक्षा कांदा पीक पूर्णपणे उन्मळून पडल्याचे गोरक्षनाथ नवले व बाबाजी कुदळे यांनी दिली.
तातडीने ज्वारी, कांदा पीक यांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे व विनाविलंब शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अजय कंधारे, श्री वाकेर्श्वर शिक्षक संस्थेचे सचिव मयुर काळे, वसंतराव एरंडे, प्रकाश कुदळे व संदीप फणसे यांनी केली आहे.
हेही वाचा :