पुणे

लवकरच वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवरायांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील अतिमागास वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका असे होणार आहे. तशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 3) मावळा जवान संघटना व तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगड किल्ल्यावरून जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचा, हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. स्वराज्याची पहिली राजधानी व स्वराज्यातील पहिला तालुका असलेल्या राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या त्रिशत अमृतमहोत्सवी (375 वर्ष) वर्षात छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.

शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, मावळा संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस, रोहित नलावडे, युवराज काकडे व तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी दरे (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना राजगड तालुका नामांतराचा प्रस्ताव देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांना शिवकाळात राजगड तालुका असलेली ऐतिहासिक कागदपत्रे सादर करण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगितले. वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करून शिवरायांच्या विश्ववंदनीय लोककल्याणकारी कार्याचा राज्यासह देशभरात तसेच जगभरात गौरव होणार आहे.
राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. राज्यात शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या नावाने गावे, शहर, तालुके, जिल्हे आहेत.

वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने ठराव केले आहेत. जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, खासदार व लोकप्रतिनिधीनींही मागणी केली आहे. तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी नामांतराचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत, अशी माहितीदेखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT