पुणेकरांची गर्दीतून सुटका; लवकरच मेट्रोच्या ताफ्यात 15 नव्या ट्रेन, 45 डबे वाढणार Pudhari
पुणे

Pune Metro: पुणेकरांची गर्दीतून सुटका; लवकरच मेट्रोच्या ताफ्यात 15 नव्या ट्रेन, 45 डबे वाढणार

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात 15 नव्या ट्रेन; म्हणजेच एकूण 45 डबे वाढणार आहेत. महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

महामेट्रो प्रशासनाने नुकत्याच मंजूर झालेल्या नवीन दोन मार्गिकांसाठी या 15 ट्रेन खरेदी करण्याची योजना आखली आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये प्रत्येकी तीन कोच (डबे) असतील. सध्या पुणे मेट्रोकडे 34 ट्रेन उपलब्ध आहेत. (Latest Pune News)

यामध्ये एकूण 102 कोच पुणेकरांसाठी दररोज प्रवासी सेवा पुरवत आहेत. आता आणखी 45 डबे वाढल्याने एकूण डब्यांची संख्या 147 पर्यंत पोहचणार आहे. ट्रेनच्या या विस्तारामुळे पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवासाचा वेळही वाचेल, अशी आशा आहे. नवीन मार्गांवर काम पूर्ण झाल्यावर या ट्रेन सेवेत दाखल होतील, यामुळे मेट्रोचे जाळे अधिक मजबूत होईल.

मेट्रोच्या सेवेची आकडेवारी

  • सध्याच्या ट्रेन - 34

  • सध्याचे कोच - 102 न

  • वीन खरेदी केल्या जाणार्‍या ट्रेन - 15

  • नवीन वाढणारे कोच - 45

  • एकूण ट्रेन (भविष्यात)- 49

  • एकूण कोच (भविष्यात) - 147

  • सध्याचे दैनंदिन प्रवासी - 1 लाख 70 हजार

  • एकूण नियोजित दैनंदिन प्रवासी उद्दिष्ट - साडे-तीन लाखांपर्यंत

मेट्रोची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फीडर सेवेच्या माध्यमातून आम्ही मेट्रोचे प्रवासी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. सध्या आमचे दैनंदिन प्रवासी 1 लाख 70 हजारांच्या घरात आहेत. त्यांच्याकरिता सध्या 34 ट्रेनद्वारे प्रवासी सेवा पुरवली जात आहे. नुकत्याच दोन नव्या मार्गांना केंद्राकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे आम्हाला आणखी नव्या ट्रेनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आणखी 15 ट्रेन उपलब्ध होणार आहेत. एक ट्रेन, तीन कोचची असणार असून, या 15 नव्या ट्रेनमुळे आगामी काळात मेट्रोच्या ताफ्यात 45 डबे वाढतील.
- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक तथा कार्यकारी संचालक, महामेट्रो
ही खूपच आनंदाची बातमी आहे. सध्याच्या ट्रेनमध्ये विशेषतः पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. नवीन ट्रेनमुळे गर्दी नक्कीच कमी होईल. अन् आमच्यासारख्या प्रवाशांचा अनुभव निश्चितच चांगला होईल.
- कुणाल चव्हाण, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT