गोळी लागून मुलगा जखमी  File Photo
पुणे

वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून चुकून सुटलेली गोळी लागून मुलगा जखमी

पुढारी वृत्तसेवा

निवृत्त लष्करी जवानाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरला धक्का लागल्याने झालेल्या गोळीबारात 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला. धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली. याप्रकरणी जवानाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अभय नितीन शिर्के (वय 13) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के (वय 40, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के लष्करातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी रिव्हॉल्वर कपाटातील एका पिशवीत ठेवली होती. रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. शिर्के यांचा मुलगा अभय एका शाळेत सातवीत आहे.

मंगळवारी दुपारी तो घरात होता. दुपारी सव्वातीनच्या सुमारास अभयने कपाट उघडले. रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या पिशवीला धक्का लागला. पिशवी जमिनीवर पडली. रिव्हॉल्वरच्या चापावर दाब पडला आणि गोळीबार झाला. रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली एक गोळी अभयच्या पायातून आरपार गेली. त्यावेळी अभयची आई आणि लहान भाऊ घरात होते. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचे वडील निवृत्त जवान नितीन शिर्के यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT