पुणे

सोमेश्वरनगर : ऊस गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने नाहीच; शेतात पाणी साचल्याचा परिणाम

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. पावसामुळे अजूनही उसाच्या शेतात पाणी साठल्याने साखर कारखान्यांचा हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. हंगाम सुरळीतपणे सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडणार आहे. 15 ऑक्टोबरला हंगाम सुरू होऊनही पावसामुळे 15 दिवसांचा हंगाम वाया गेल्याने हंगाम बंद होण्यास पुढे 15 दिवसांचा कालावधी वाढणार आहे. दिवाळी संपल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उर्वरित ऊसतोडणी कामगार दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाला ब—ेक लागला असून, परतीच्या पावसाने दाणादाण उडविल्याने साखर कारखान्यांना उसाचे गाळप बंद करावे लागले होते. 15 ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्याचा मुहूर्त चुकल्याने या वर्षीचा ऊसगाळप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. सलग आठवडाभर पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना ऊसगाळप बंद ठेवावे लागले. कारखाने सुरू करण्याच्या दृष्टीने कारखानदारांनी अंतर्गत कामांची पूर्तता करीत ऊसतोडणी यंत्रणांशी करार पूर्ण केले आहेत.

'सोमेश्वर'सह जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांवर काही ऊसतोडणी मजूरदेखील दाखल होऊन ऊसतोड सुरू होऊन कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. मात्र, गेल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे ऊसशेतात अजूनही पाणी असल्याने रस्त्याच्या कडेचा ऊस तोडण्यास कारखाना प्राधान्य देत आहे. साखर कारखानास्थळावर केवळ 50 टक्केच ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. परिणामी, उसाअभावी कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसक्षेत्र वाढले आहे. परिणामी, साखर कारखाने 1 ऑक्टोबरलाच सुरू होणे अपेक्षित असताना शासनाने 15 ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली. 10 ऑक्टोबरपासूनच ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर आले. मात्र, त्यांची संख्या कमी होती. त्यातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने 50 टक्क्यांवर ऊसतोडणी कामगार गावाकडे अडकून पडले.

दिवाळी सणामुळे कामगार आले नाहीत, त्यामुळे आता नोव्हेंबरपासून हंगाम सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे येणार्‍या हंगामात 40 हजार 788 एकर उसाची नोंदणी झाली असून, सोमेश्वर चालू गाळपास 16 लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे. विस्तारीकरणामुळे कारखान्याची गाळपक्षमता वाढली असून, वेळेत ऊसगाळप करण्यासाठी कारखाना प्रयत्नशील राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT