पुणे

Pune News : सोमेश्वर कारखान्याच्या टाईम ऑफिसमधील अपहार प्रकरण : अपहारकर्त्याकडून ५५ लाखांची वसुली

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस हजेरी दाखवून त्याचे पैसे उकळण्याचा प्रकार टाईम ऑफिसमध्ये घडला होता.

पुढारी वृत्तसेवा

someshwar sugar factory time office corruption case

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफिसमध्ये अपहार झाल्याचे कारखान्याने स्थापन केलेल्या चौकशी समितीत निष्पन्न झाले होते. अपहार करणाऱ्या रूपचंद साळुंखे या कर्मचाऱ्याकडून अपहार व कर अशी मिळून ५४ लाख ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. कारखान्याने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून व संचालक मंडळाकडून दोषींवर काय कारवाई होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस हजेरी दाखवून त्याचे पैसे उकळण्याचा प्रकार टाईम ऑफिसमध्ये घडला होता. यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने टाईम ऑफिसचे अधिकारी व कामगार असे सहा जण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित करत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

साखर आयुक्तालयाच्या पॅनेलवरील मेहता-शहा चार्टर्ड अकौटंट कंपनीने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२५ या आठ वर्षे कालावधीतील कारभाराची तपासणी केली. यामध्ये ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, विधिज्ञ ॲड. मिलिंद पवार यांच्या समितीने कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यावर तर अपहाराचा ठपका रूपचंद साळुंखे याच्यावर ठेवला होता.

दरम्यान विलास निकम, दीपक भोसले, सुरेश होळकर, श्री. बनकर हे चौघे कामगार व कंत्राटदार शशिकांत जगताप यांनी कुठलाही अपहार केला नसल्याचे निष्पन्न झाले होते. सहकार कायद्यान्वये कायदेशीर कारवाईसाठी व वसुलीसाठी ॲड. मंगेश चव्हाण यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने सर्वांना म्हणणे मांडण्याची संधी देत रूपचंद साळुंखे याच्याकडून टप्प्याटप्प्याने अपहाराची रक्कम भरून घेण्यात यश मिळविले आहे.

रकमांची वसुली केल्याचे सभासदांमधून स्वागत होत आहे; मात्र आता साळुंखे व निंबाळकर यांच्यावर समिती निलंबनाची कारवाई करणार की गुन्हे दाखल करणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. तसेच निर्दोष असलेले निकम, भोसले, होळकर, बनकर यांना न्याय कधी मिळणार याचीही चर्चा होत आहे.

कराच्या रकमेसह एकूण ५४ लाख ४७ हजारांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. सर्व रकमा रूपचंद साळुंखे याने भरल्या आहेत. ॲड. चव्हाण समिती खात्यांतर्गत चौकशी लवकरच पूर्ण करून दीपक निंबाळकर व रूपचंद साळुंखे यांच्यावर कारवाई प्रस्तावित करेल. निर्दोष असलेल्यांना रूजू करण्याचा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT