पुणे

बारामती : सोमेश्वर साखर कारखाना चार तास राहिला बंद

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : एफआरपीचे टप्पे न करता ती एकाच टप्प्यात मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. 17 व 18 नोव्हेंबरला लाक्षणिक ऊसतोड बंदचे आवाहन केले होते. यासंबंधी संघटनेकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला पत्र देण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी (दि. 17) कारखाना चार तास बंद ठेवण्यात आला. शुक्रवारी (दि. 18) मात्र तालुक्यात ऊसतोडणी पूर्ववत सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

यंदाच्या हंगामात कारखाने सुरू होऊन आता जवळपास महिना होत आला, तरी अद्याप एफआरपी जाहीर केलेली नाही. तसेच, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एफआरपी टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय झाला होता. त्याला स्वाभिमानीचा विरोध आहे. याच प्रश्नावरून स्वाभिमानीने गत आठवड्यात साखर संकुलावर मोर्चा काढला होता.

या वेळी 17 व 18 नोव्हेंबरला ऊसतोडी पूर्णतः बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दोन दिवस तोडी बंद राहतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही वादाचे प्रसंग उद्भवतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. कारखाना व परिसरात पोलिसांनी त्यादृष्टीने पुरेसा बंदोबस्तही तैनात केला होता. परंतु, बारामती तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

स्वाभिमानीचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला बारामतीजवळ भवानीनगर येथे ऊस परिषदेत तसेच त्यानंतर दुसर्‍या दिवशी बारामतीत पत्रकार परिषद घेत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याशिवाय संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी कारखान्यांना पत्र देत शेतकर्‍यांवर ऊसतोडीसाठी तसेच वाहनधारकांवर ऊसवाहतुकीसाठी दबाव टाकू नये, अशी मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी सोमेश्वर कारखाना चार तासांसाठी बंद राहिला. शुक्रवारी मात्र तालुक्यात ऊसतोडी पूर्ववत सुरू झाल्या.

SCROLL FOR NEXT