मोहसीन शेख
बाणेर : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना भेटण्याच्या वेळेत विभागानुसार नेमण्यात आलेले अधिकारी अनुपस्थित दिसून आले. काही अधिकारी उशिरा आले, तर ही थेट फिल्डवर जात असल्याचे चित्र समोर आले. दहा, सव्वादहा वाजेनंतर अधिकारी कार्यालयात येताना पाहावयास मिळाले. लेटलतिफांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी व नवीन जोडण्यात आलेल्या सूस, म्हाळुंगे या गावांचा समावेश आहे. ही नवीन गावे जोडण्यात आल्यामुळे या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयातील कामकाज वाढले असून, नागरिकांच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यावर कितपत भर दिला जाणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
क्षेत्रीय कार्यालयात पाहणी केली असता सकाळच्या वेळी नागरिकांचा समस्या घेऊन येण्याचा ओघ थोडा कमीच दिसत होता.
आरोग्य विभागातील अधिकारी,उपअभियंता, अतिक्रमण विभाग, सहायक आयुक्त आदी अधिकारी जागेवर नसल्याचे दिसून आले.
तसेच क्षेत्रीय कार्यालय नागरिकांना आवश्यक असलेले विभाग आरोग्य विभाग, नागरी सुविधा केंद्र, आधार कार्ड, कर विभाग सुरू होते. नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागल्या असून, ते आपापले कामे करून घेत असल्याचे पाहण्यात आले. काही विभागांत मात्र कर्मचारी गप्पा मारत बसलेले व चहापानाला गेलेले असल्याचे लक्षात आले.
नागरिकांच्या समस्यांची पाहणी व मुख्य खात्यात असलेल्या बैठकीला जावे लागत असल्याने अनेकदा कार्यालयात आलेल्या नागरिकांची भेट होत नाही. क्षेत्रीय कार्यालयात बायोमेट्रिक बसविले असून, 99 टक्के कर्मचारी वेळेवर येतात. जे वेळेवर येत नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाते. गेले दोन दिवस काही अधिकारी सुटीवरही होते.
– संदीप खलाटे,
सहायक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय