फुरसुंगी : कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेला पुणे-सोलापूर महामार्ग सध्या ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. काम झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांतच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, खडी पसरली आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रवी दर्शन सोसायटी ते मांजरी फार्मपुढे फुरसुंगी फाटा दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर डांबरीकरण करण्यात आले. पूर्वीचा रस्ता सुस्थितीत असतानाही त्यावर दुरुस्तीचे (नूतनीकरण) काम करण्यात आले होते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अवघ्या आठ महिन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा रस्ता पुरता उखडला गेला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या काही व्यावसायिकांनी पावसाळी वाहिनी राडारोडा टाकून बुजवल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात आली असून, दुरवस्था झालेल्या ठिकाणी रस्त्याचे काम तत्काळ करण्यात येईल.अतुल सुर्वे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पुणे-सोलापूर महामार्ग महत्त्वाचा रस्ता आहे. तरी देखील या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. हा महामार्ग सुस्थितीत असताना देखील कोट्यवधी रुपये खर्च करून त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी कबुली तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली होती. काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने काही ठिकाणी खडी निघून गेल्याचे निदर्शनास आले होते. दुरवस्था झालेल्या रस्त्याची संबंधित ठेकेदाराने तातडीने दुरूस्ती करावी, असेही त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पावसाळ्याच्या तोंडावरच हा रस्ता उखडल्याने कामाच्या दर्जाविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे.