पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये इन्फ्लुएन्झा ए – एच 3 एन 2 चे आतापर्यंत एकूण 24 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहर हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी 22 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. 'एच 3 एन 2' ने बाधित 3 रुग्ण हे यापूर्वीच रुग्णालयात दाखल होते. त्यांचे अहवाल खासगी रुग्णालयाकडून उशिरा कळविण्यात आले.
सर्व रुग्ण यापूर्वीच बरे झालेले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एच 3 एन 2 या आजारावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या महापालिका दवाखाना, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.