देहूगाव: मला मिळालेला संत तुकाराम महाराज पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही. माझ्यावर प्रेम करणार्या वारकरी, धारकरी, शेतकरी आणि माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून, समाजाची सेवा अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
देहूगाव येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 16) संत तुकाराम महाराज संस्थानकडून देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी संस्थानचे संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांच्यासह अन्य विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की वारकरी संप्रदायाबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू संस्थानने दिला. त्यासाठी त्यांनी मला योग्य समजले, हे माझ्यासाठी फार भाग्याचे आहे. हा पुरस्कार मिळाला असल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे.
समाजाची सेवा अधिक जोमाने करण्याची प्रेरणा यातून मला मिळाली आहे. वारकर्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारामुळे मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. वारकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्य मंदिरात जाऊन संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच, भंडारा डोंगरपायथ्याशी असलेल्या सप्ताहालाही भेट दिली.
संत तुकाराम महाराज पुरस्काराचे मूल्य मोठे आहे. आपण याप्रमाणे उत्तुंग अशी भरारी घ्यावी आणि आपल्या कर्तृत्वातून जनतेची सेवा घडावी. तसेच, तीर्थक्षेत्राचा विकास घडावा, अशी अपेक्षा देहू देवस्थान संस्थानचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे यांनी या वेळी व्यक्त केली.
देहू देवस्थानच्या वतीने राज्यातील एका कर्तबगार व्यक्तीचा संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या रूपाने संत तुकाराम महाराजांचाच आशीर्वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. या राज्यात जेवढी तीर्थस्थळे आहेत, त्या सर्व तीर्थस्थळांना सुविधा देण्याचे व विकास करण्याचे काम उपमुख्यमंत्री शिंदे करतील, असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.