पुणे: ‘हवाला’च्या अमेरिकन डॉलरची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नामी शक्कल लढविल्याचे पुढे आले आहे. केंद्रीय सीमा शुल्क विभागाला सुगावा लागू नये म्हणून चक्क पुस्तकातून डॉलर लपविले जात होते. त्यानंतर हे पुस्तक सॅमसोनाईट बॅगेत ठेवून विमानातून घेऊन जाण्यात येत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, मागील आठवड्यात पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कारवाई करत 4 लाख 100 अमेरिकन डॉलर पकडले आहेत.
याप्रकरणी दोघांना सीमा शुल्क विभागाने अटक केली असून, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या डॉलरची किंमत भारतीय चलनात 3 कोटी 47 लाख रुपये असल्याचे सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. हे डॉलर हवालामार्फत दुबईला पाठविण्यात येत होते.
मात्र, गोपनीय माहिती मिळताच त्यांचा हा प्लॅन सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला. खुशबू अग्रवाल (वय 41) आणि मोहम्मद आमीर (वय 50) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दहा ते बारा ठिकाणांची तपासणी करण्यात आली. कस्टमच्या तपासात आत्तापर्यंत 14 ते 15 वेळा तब्बल 20 लाख अमेरिकन डॉलरची ’हवाला’मार्फत तस्करी झाल्याचाही धक्कादायक प्रकार यानिमित्त समोर आला आहे.
आमीरच्या मुंबई येथील कार्यालयात आणि घरात सापडलेल्या सतरा देशांच्या विदेशी चलनाची किंमत भारतीय रुपयात 45 लाखांच्या घरात असल्याचे सीमा शुल्क विभागाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.या प्रकरणात सध्या दोघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, विशेष सरकारी वकील ऋषिराज वालवेकर कस्टम विभागाच्या वतीने बाजू मांडत आहेत.
विविध 17 देशांच्या जप्त चलनांचे मूल्य (रुपये)
यूएई धिरम- 38,150 (9,05,606), ऑस्ट्रेलियन डॉलर- 20 (1,105), कॅनेडियन डॉलर-25- (1,528), स्वित्झरलंड फ्रॅन्स- 760-(74,129), चायनीज युआन रेनमीनबी-330-(3,964), युरो- 2100-(1,92,181), ग्रेट ब्रिटन पौंड - 1570- (1,73,378), श्रीलंकन रुपी- 20 (5), न्यूझीलंड डॉलर्स- 1100- (54,912), ओमानी रियाल्स -256- (57,972), कतारी रियाल्स- 410-(9,812), रशियन रुबल्स -3000-(3,019), सौदी रियाल्स- 5175-(1,20,302), सिंगापूर डॉलर्स - 6165 (4,02,022), थायलंड भाट - 71,680- (1,85,655), यू. एस. डॉलर-21,935- (19,11,996), साऊथ आफ्रिकन रँड -60 (285).