पुणे

पिंपरी : पालिका शाळांत स्मार्ट टीव्ही; पण सेवासुविधांचे काय?

अमृता चौगुले

दीपेश सुराणा

पिंपरी : महापालिका शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही आले असून, त्यामुळे स्मार्ट शिक्षणाकडे या शाळांची वाटचाल सुरू झाली आहे. एकीकडे स्मार्ट शिक्षण देण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे शाळांमध्ये मात्र सेवासुविधांची कमतरता पाहण्यास मिळत आहे. विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत अपुर्‍या पडणार्‍या वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची कमी संख्या, अपुरी मैदाने अशी स्थिती पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे 128 शाळांच्या तुलनेत इमारतींची संख्या केवळ 87 आहे. त्यामुळे अद्यापही काही शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत भरवाव्या लागत आहेत.

शहरामध्ये महाापालिकेच्या 110 प्राथमिक तर, 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांसाठी सध्या 87 शाळा इमारती आहेत. शाळांमध्ये शिकणारी मुले ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील आहेत. या मुलांना स्मार्ट शिक्षण मिळावे, म्हणून प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत. त्या माध्यमातून शाळांमध्ये स्मार्ट शिक्षण सुरू झाले आहे.

विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण देण्यासाठी एकीकडे महापालिका प्रशासनाचा खटाटोप सुरू असताना भौतिक सुविधांच्या पातळीवर मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काय आहे वास्तव महापालिकेच्या काही निवडक शाळांना दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने मंगळवारी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, शाळांतील भौतिक सुविधांची नेमकी स्थिती जाणून घेतली. त्याचा हा 'आँखों देखा हाल..'

शाळेमागील क्रीडांगण वापराशिवाय पडून
मनपा माध्यमिक विद्यालय (संत तुकारामनगर) ः शाळेत 130 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यासाठी सध्या उपलब्ध स्वच्छतागृह अपुरे पडत आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने येथे मुले, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारलेले आहे. शाळेसमोरील क्रीडांगणाचा वापर होत असला तरी शाळेमागील क्रीडांगण वापराशिवाय पडून आहे. या क्रीडांगणात गवत वाढलेले आहे. कोरोनाच्या काळात बसविलेले फूड पेडल सॉफ्ट डिस्पेन्सर चालू स्थितीत आहेत. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, ग्रंथालय, प्रयोगशाळा आदी सुविधा आहेत.

वर्गखोल्या कमी : दोन सत्रांमध्ये भरते शाळा
विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय, पिंपरी ः शाळा इमारतीत सध्या उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या कमी पडत आहेत. त्यामुळे सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत शाळा भरत आहेत. सकाळच्या सत्रात बालवाडी आणि पाचवी ते सातवीचे वर्ग भरतात. तर, दुपारच्या सत्रात पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. या शाळेत सध्या 8 वर्गखोल्या आहे. त्यातील 4 वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या वर्गासाठी तर, शाळा कार्यालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा आणि खेळ साहित्य यांच्यासाठी प्रत्येकी एक वर्गखोली आहे. शाळेत सध्या मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असले तरी शाळेमध्ये 471 इतकी विद्यार्थी संख्या आहे. त्या तुलनेत हे स्वच्छतागृह अपुरे पडत आहे. त्याचप्रमाणे, पिण्याच्या पाण्याची सोय असली तरी नळ खूपच अत्यल्प आहेत. ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट टीव्ही आदी सुविधा शाळेत आहेत.

क्रीडांगण, स्वच्छतागृह विद्यार्थ्यांसाठी अपुरे
महापालिकेच्या केशवनगर येथील प्राथमिक शाळा सध्या जुन्या इमारतीत सुरू आहे. या शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शाळा नव्या इमारतीत हलविण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार, नव्या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. नव्या इमारतीमध्ये 4 वर्गखोल्यांची सोय होणार आहे. तर, शाळेमागील बाजूस असलेल्या सभागृहात 3 वर्ग भरविण्यात येणार आहे. शाळेसाठी सध्या असलेले क्रीडांगण विद्यार्थ्यांना अपुरे पडत आहे. शाळेच्या पाठीमागील बाजूसदेखील क्रीडांगण आहे. मात्र, तेथे काही प्रमाणात गवत उगवले आहे. स्वच्छतागृह विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहेत. बालवाडीसह येथे पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. एकूण विद्यार्थिसंख्या 264 इतकी आहे. शाळेत सध्या संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा आहे.

महापालिकेच्या 38 शाळांमध्ये सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी गळती काढणे, जिना, फरशा आदींची दुरुस्ती आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, काही ठिकाणी नव्याने इमारती होत आहेत. शाळांना पूर्वीपासून मैदाने कमी आहेत. शाळांना जोडून काही मैदाने मिळतात का, याची चाचपणी करण्यात येईल. 40 विद्यार्थ्यामागे एक स्वच्छतागृह असा निकष आहे. त्यानुसार स्वच्छतागृहे पुरेशी आहेत.

                               – संदीप खोत, उपायुक्त, महापालिका.

शाळेच्या जुन्या इमारतीमधून शाळा नव्या इमारतीत लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार जुनी इमारत खाली करण्यास सांगितले आहे.

                       – नामदेव शेळकंदे, मुख्याध्यापक, केशवनगर मनपा शाळा.

शाळेत विविध भौतिक सुविधांची पूर्तता केलेली आहे. स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शाळेसाठी इमारत कमी पडत असल्याने दोन सत्रांमध्ये शाळा भरते.

      – अंजली झगडे, मुख्याध्यापिका, विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय, पिंपरी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT