स्मार्ट सिग्नलमुळे वाढणार पुण्यातील वाहतुकीचा वेग File Photo
पुणे

Pune smart traffic signals: स्मार्ट सिग्नलमुळे वाढणार पुण्यातील वाहतुकीचा वेग

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 2022 मध्ये महापालिकेने शहरातील 125 प्रमुख चौकांमध्ये एटीएमएस प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यातील वाहतूक वेगवान करण्यासाठी व चौकाचौकात होणारी कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अ‍ॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) कार्यक्षम करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी, महापालिका व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वयामुळे या प्रणालीतील अनेक त्रुटी दूर करण्यात आल्याने मुख्य रस्त्यांवरील कोंडी कमी होऊन वाहनचालकांना सलग हिरवा सिग्नल मिळत असल्याने वाहतूक वेगाने होत आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 2022 मध्ये महापालिकेने शहरातील 125 प्रमुख चौकांमध्ये एटीएमएस प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीमुळे वाहतुकीच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलणे, वाहनचालकांना सिग्नलची उर्वरित वेळ दाखविणे आणि नियंत्रण कक्षातून शहरातील वाहतुकीवर सतत लक्ष ठेवले जाणार होते. या यंत्रणेतील सिग्नल बसविण्यासाठी व नेटवर्क तयार करण्यासाठी 133 कोटी व देखभाल व दुरुस्तीसाठी 52 कोटी रुपये मंजूर केले. (Latest Pune News)

प्रत्येक चौकात कॅमेरे बसवल्यामुळे वाहनांची नोंदणी आणि वाहतूक विश्लेषणही या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. ही यंत्रणा बसवल्यावर महापालिकेला नियमित माहिती मिळत नव्हती, यामुळे विद्युत विभागाला स्मार्ट सिटी कंपनीकडे वारंवार पत्रव्यवहार करावा लागत होता. यामुळे या नव्या यंत्रणेबाबत अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या.

या तक्रारी कमी करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटी अधिकार्‍यांचा विशेष समन्वय गट तयार करण्यात आला. या गटाने अनेक सूचना केल्या. त्याची पूर्तता करण्यात येऊन महापालिकेने या यंत्रणेच्या ठेकेदाराला गेल्या वर्षी 30 कोटी रुपयांचे देयक अदा केले. परिणामी देखभाल व दुरुस्तीच्या गतीत वाढ झाली. यामुळे शहरातील अनेक चौकातील सिग्नल कार्यक्षम झाले आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरळीत झाला.

या यंत्रणेमुळे झाले महत्त्वाचे बदल

या यंत्रणेत दुरुस्ती करण्यात आल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुमारे 15 टक्क्यांनी कामी झाली. यामुळे वाहनांच्या सरासरी वेगात देखील 10 टक्क्यांनी वाढ झाली. तर 70 टक्के वाहनांना सिग्नलवर न थांबता हिरवा सिग्नल मिळत असल्याने प्रवास वेगवान झाला असून प्रदूषण व इंधन वापर देखील घटला.

सध्या एटीएमएस प्रणाली चौकातील कॅमेर्‍यांच्या मदतीने वाहतुकीचे विश्लेषण करते आणि त्यानुसार सिग्नलची वेळ बदलते. या बाबत माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, या प्रणालीत गुगल मॅप्सचे डेटाही समाविष्ट केल्यास चौकापुरतेच नव्हे तर संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक स्थिती लक्षात घेऊन सिग्नलची वेळ बदलणे शक्य होईल. त्यामुळे पुणेकरांना आणखी सुरळीत सेवा मिळेल.

एटीएमएसमधील त्रुटींमुळे सुरुवातीला तक्रारी वाढल्या होत्या. पण, आता समन्वय गटाच्या मदतीने समस्या लगेच सोडवल्या जातात. ठेकेदाराचे बिल दिल्यामुळे त्यांच्या अडचणीही कमी झाल्या आहेत. भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT