भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन पाणी योजनेच्या तलावासाठी सणसर (हिंगणेवाडी, ता. इंदापूर) येथे गायरानातील झाडांची सर्रास कत्तल सुरू करण्यात आली आहे. सामान्य शेतकर्यांना बांधावरचे एखादे अडचणीचे झाड तोडले तरी कारवाईची भीती दाखविणारा वनविभाग मात्र या योजनेच्या ठेकेदाराच्या वळचणीला बसला आहे. सणसर परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हिंगणेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तलाव करण्यात येणार आहे.
रस्त्यांच्या साईडपट्ट्या खोदल्या
हिंगणेवाडी परिसरात सध्या चारी खोदून त्यामध्ये पाण्याची वाहिनी टाकून बुजवण्यात येत आहे. बर्याच ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खोदून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हिंगणेवाडी परिसरात सणसर- कुरवली या रस्त्याच्या बाजूने साईडपट्टी खोदून जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. रस्त्यावर बर्याच ठिकाणी मातीचे ढीग तसेच ठेवण्यात आलेले असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
हिंगणेवाडीसाठी योजना तीन,पण थेंबही नाही
हिंगणेवाडीसाठी मागील आठ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 14 लाख रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेची चाचणीदेखील अद्याप झालेली नाही. तसेच या योजनेतून ग्रामस्थांसाठी एक थेंबही पाणी आलेले नाही, त्यातच मागील वर्षी साडेसहा लाख रुपयांचा निधी दलित सुधार योजनेतून मंजूर करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेतून देखील अद्याप ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी आलेले नसतानाच आता पुन्हा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करून पुन्हा पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात येत आहे.
हिंगणेवाडी परिसरात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यापेक्षा जलवाहिन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. या योजनेच्या तलावासाठी भवानीनगर रायतेमळा या ठिकाणी रिकामी जागा असताना हिंगणेवाडी येथेच तलाव घेण्यात येत आहे. येथील झाडे तोडण्यात येत असून या ठिकाणी असलेली स्मशानभूमी देखील काढावी लागणार आहे.
श्रीनिवास कदम, माजी उपसरपंच, सणसर