पुणे

लोणावळा : चोरटे-स्थानिकांमध्ये चकमक ; घरफोडीचा प्रयत्न फसला

अमृता चौगुले

लोणावळा : येथील सह्याद्रीनगर, हुडको कॉलनी याठिकाणी तीन दरोडेखोरांनी एका घरात चोरी करण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, यादरम्यान चोरटे आणि स्थानिकांमध्ये उडालेल्या चकमकीत काही स्थानिक युवक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना 27 डिसेंबरच्या रात्री 2.15 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वृषाली हनुमंत राऊत (वय 34 वर्ष, रा. पसायदान, सह्याद्रीनगर हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली असून, लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील साहित्य विस्कटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे घरात चोरीच्या उद्देशाने शिरत असल्याची चाहूल शेजारच्या घरातील लोकांना लागल्याने त्यांनी आजूबाजूच्या काही जणांना फोनवरून याची कल्पना दिली. त्यानंतर काही युवक घराबाहेर येऊन ज्या घरात चोर घुसले होते तिकडे जात असतानाच चोर घराबाहेर पडले आणि त्यांचा सामना स्थानिक युवकांशी झाला.

यात दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या कॅटीमधून मारलेल्या गोट्यांमुळे दोन युवक किरकोळ जखमी झाले. दरम्यान, तिन्ही चोरटे त्यांनी सोबत आणलेल्या दुचाकीवरून पोबारा करण्यात यशस्वी झाले. ही सर्व घटना समोरच्या एका घरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT