CBSE 10th Result 2024 
पुणे

दहावीपर्यंतची पोरं होणार हुश्शार ! राज्यात आता निपुण भारत गुणवत्तावृद्धी उपक्रम

अमृता चौगुले

गणेश खळदकर : 

पुणे : राज्यात मार्च 2022 मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सर्वेक्षण घेण्यात आले. यामध्ये तिसरीच्या मुलांची संपादणूक क्षमता कमी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत गुणवत्तावृध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी 31 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात येणार असून, फेब—ुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यास 2026 पर्यंत मूलभूत स्तरावर वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यानुसार भारत सरकारने निपुण भारत अभियानाची सुरुवात केली आहे. संबंधित अभियानाची राज्य ते जिल्हास्तरावर सुयोग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आली आहे.  कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन र्‍हास जाणून घेण्यासाठी पायाभूत साक्षरता व मूलभूत संख्याज्ञानविषयक अध्ययन स्तरनिश्चिती करण्यात येईल. विद्यार्थी स्तरनिश्चितीनुसार उपचारात्मक अध्यापनासाठी शिक्षक उद्बोधन व पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेने अध्यापन मॉड्यूल, मूल्यमापन आणि उपक्रम यांचा समावेश असलेली योजना तयार केली आहे. हा कार्यक्रम तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने निपुण भारत कार्यक्रमांतर्गत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे.

असे होणार मूल्यमापन…

कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, आठ आठवडे करण्यात येईल. फेब—ुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. मूल्यमापनाचे साधन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत विकसित केले जाईल. मूल्यमापन करण्याबाबतचे प्रशिक्षण व प्रपत्रात गुण भरणे इत्यादी माहिती प्रशिक्षणाद्वारे दिली जाईल. मूल्यमापनासाठी शिक्षक स्वतःच्या शाळेऐवजी आपल्या केंद्रातील इतर शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतील. मूल्यमापनासाठी केंद्रांतर्गत शिक्षकांना शाळा बदलून देण्याचे नियोजन केंद्रप्रमुखांनी केंद्रपातळीवर तयार करून ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT