पुणे

बारामतीत सीतारामन यांचे रणशिंग; पवार कुटुंबाच्या घराणेशाहीविरोधात मतदारसंघ काढला पिंजून

अमृता चौगुले

सुहास जगताप
पुणे : 'मिशन बारामती'चा नारा देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौर्‍याने बारामती लोकसभा मतदारसंघाचे वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या तीनदिवसीय दौर्‍यात सीतारामन यांनी खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर असे सहा तालुके पिंजून काढले. या दौर्‍याचे स्वरूप पाहता सध्यातरी भाजपने आपले केडर सक्रिय करण्यावरच भर दिल्याचे दिसून येते. सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबाच्या घराणेशाहीवर बोट ठेवत एका अर्थाने आगामी लढाईचे रणशिंगच फुंकले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या हाती यावा, हा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय पातळीवर भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठीच केंद्रीय अर्थमंत्री या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेल्या सीतारामन यांच्याकडे बारामतीची जबाबदारी दिलेली आहे. या पदाचा वापर करून मतदारसंघातील काही प्रश्न सीतारामन या लागलीच मार्गी लावू शकतात, केंद्रीय पातळीवरील प्रश्नांसाठी तत्काळ निर्णय देऊ शकतात, हा त्यांच्या नेमणुकीमधील हेतू दिसतो.

सीतारामन यांच्या दौर्‍यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच 'चार्ज' झाल्याचे दिसत आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते गळाला लागले आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे. सीतारामन यांच्या अत्यंत साध्या राहणीचाही प्रभाव कार्यकर्ते आणि मतदारांवर दिसून आला. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमानंतर याची चर्चा होताना दिसत होती. मुक्काम आणि दुपारचे भोजनही त्यांनी भाजप नेत्यांच्या घरीच केले. आमदार भीमराव तापकीर, हर्षवर्धन पाटील यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला, तर आमदार राहुल कुल यांच्या घरी त्यांनी दुपारचे भोजन घेतले, याचा चांगलाच प्रभाव दिसून आला.

सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबाच्या घराणेशाहीवर बोट ठेवत एका अर्थाने लढाईचे रणशिंगच फुंकले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना घराणेशाहीला छेद देण्याचा निर्धार बोलून दाखविला होता. तीच 'टॅगलाइन' पकडत भाजपने बारामतीतील घराणेशाही राज्याला कशी पोखरत आहे, हे मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. बारामती लोकसभा मतदारसंघातच बारामती वगळता इतर तालुक्यांवर कसा अन्याय झाला आहे, हे सीतारामन यांच्या दौर्‍यात आवर्जून ठळकपणे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

बारामतीमध्ये आपण पवारांचा पराभव करू शकतो, तुम्ही प्रयत्न करा, केंद्रीय नेतृत्व तुमच्या पाठीशी आहे, असा आत्मविश्वास भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात सीतारामन यशस्वी झाल्या आहेत. सीतारामन यांनी आपल्या दौर्‍यात शेळगाव, जंक्शन, निमगाव केतकी, पिंपळगाव, वरवे अशा छोट्या गावांपासून मतदारसंघातील बारामती, इंदापूर अशा शहरांपर्यंत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. छोट्या सभा, बैठकांवर त्यांनी भर दिला.

पक्षाचे सोशल मीडिया सेल, महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी आवर्जून संवाद साधला. शेतकरी, वकील, डॉक्टर, व्यापारी अशा मतदारांवर प्रभाव पाडणार्‍या घटकांचे छोटे मेळावे घेऊन त्यांनी संवाद साधला. मोठ्या सभा, रॅली याऐवजी मतदारांशी थेट संपर्क करून अडीअडचणी समजून घेण्यावर त्यांनी भर दिला.

बारामती मतदारसंघ कायम चर्चेत ठेवायचा, पवारांची घराणेशाही पुढे येईल, असे प्रयत्न करायचे, बारामतीव्यतिरिक्त मतदारसंघात विकास खुंटलेला आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, याकडे पवारांनी बारामतीशिवाय इतरत्र पाहिलेले नाही, हे बिंबवायचे ही भाजपची योजना सीतारामन यांच्या दौर्‍याने यशस्वी झाल्याचे चित्र आहे. सीतारामन यांना अनेक प्रश्न, समस्या यासंबंधीची निवेदने दिली गेली आहेत.

त्यामध्ये राज्य सरकारच्या पातळीवरचे अनेक प्रश्न आहेत, तसेच रेल्वेशी संबंधित अनेक निवेदनेही त्यांना देण्यात आली आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात काय होते, यावर त्यांच्या दौर्‍याचे यश अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत सीतारामन यांचे बारामती मतदारसंघात आणखी पाच दौरे होणार आहेत, त्या वेळी त्यांना स्वीकारलेल्या निवेदनाबद्दल सांगावे लागेल. लोकांचे प्रश्न सोडवून आपण पवारांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवून द्यावे लागेल.

SCROLL FOR NEXT