सुदाम नेवसे
सुपे : आपल्या भावाच्या जमिनी, जागा संपत्तीसाठी संपूर्ण हयातीमध्ये न्यायालयामध्ये भावाविरुद्ध लढून ती बळकवण्यात फुशारकी मारणार्या अनेक बहिणीही न्यायालयाच्या पायरीवर भेटतात. मात्र भोंडवेवाडीतील एका बहिणीने आपल्या भावाला किडनी दान करत जीवदान दिले. एकीकडे रक्ताच्या नात्यापेक्षा क्षणभंगूर संपत्तीसाठी आपल्याच माणसांच्या विरोधात उभे राहणारे पाहिले तर दुसरीकडे ही नाती जपण्यासाठी प्रसंगी भावासाठी जीवाची परवा न करणार्या बहिणीही विरळ्याच आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील आपल्या एकुलत्या एक भावाचा जीव वाचवण्यासाठी सात बहिणी एकवटल्या. भोंडवेवाडी येथील अमोल वाल्मीक भोंडवे (वय 36) याचे लग्न झाले. आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा त्याचा प्रपंच अगदी मजेत चालला होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो सहकारनगर पुणे येथे बँकेत रुजू झाला.
शेती व नोकरीतून मिळणार्या उत्पन्नातून आनंदी जीवन जगण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याच्या सातही बहिणींचे विवाह झाले होते .पाच महिन्यांपूर्वी त्यांचे वडील मयत झाल्यानंतर तीन महिन्याने अमोल बँकेत चक्कर येऊन पडला. हडपसर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर त्याच्या दोन्हीही किडन्या 90 टक्के निकामी झाल्याचे निदान झाले. मात्र, संपूर्ण कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली.
सात बहिणी, दाजी, मेहुणे, चुलत भाऊ सर्व जण एकाच विचाराने पुढे आले. किडनी देण्यासाठी या सर्वांच्यात एकमत झाले. शासकीय नियमानुसार रक्त नात्याप्रमाणे बहिणींमधील सहाव्या बहिणीची किडनी देण्यासाठी निवड झाली. दरवर्षी भावाला रक्षाबंधनाला राखी बांधणारी व भाऊबीजेसाठी ओवाळणारी आणि कसल्याच प्रकारची अपेक्षा न करणारी लिंगाळी (ता. दौंड) येथील अश्विनी शरद जगदाळे या बहिणीने आपला भाऊ अमोलला किडनीचे दान दिले.
हृदय बंधनातून आपल्या भावाला जगण्याचे बळ देणार्या आश्विनीवर भोंडवेवाडी व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता अमोलला व त्याच्या बहिणीला कसलाच त्रास होत नाही. अमोल पूर्ववत कामावर रुजू झाला आहे. बहिणही पुण्यात नोकरीला आहेत.
प्रवीण भोंडवे, सदाशिव शेळके, शरद जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकतभाई कोतवाल, पुणे संभाजी बि-गेडचे माजी अध्यक्ष संजयसिंह शिरोळे यांचे या शस्त्रक्रियेसाठी मोलाचे योगदान लाभले आहे. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अमोलवर आहे. बहिणीने किडनी दान केल्यामुळे अमोलला नवीन जीवन प्राप्त झाले आहे.
फवारणी करताना काळजी घ्या
अवेळी जेवणामुळे अमोलच्या शरीरातील अवयवांची शक्ती कमकुवत झाली. तसेच अमोलने गावाकडे आल्यावर शेतामध्ये विषारी औषध फवारणी करताना काळजी घेतली नाही, त्यामुळे त्याच्या किडनीवर परिणाम झाला असल्याचे जहांगीर हॉस्पिटलचे डॉ. अंबिके यांनी सांगितले.