पुणे: भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रोड भागातील तुकाईनगर परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सई श्रीकांत भागवत (वय 19, रा. भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे.
याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपश्री भागवत (वय 48) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हिंगणे ते सिंहगड रोड गणेश कॉलनी समोरील रस्त्यावर वडगाव बुद्रुक परिसरातील तुकाईनगरमध्ये घडली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत होती. गुरुवारी (दि.26 जून) दुपारी ती दुचाकीवरून घरी निघाली होती. सिंहगड रोड भागातील गणेश कॉलनी समोरील रस्त्यावर भरधाव ट्रकने सईला धडक दिली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहेत. पोलिस उपनिरीक्षक कांजळे तपास करत आहेत.
शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रक अशा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आदेश धुडकाविणार्या अवजड वाहनांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरात गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडले आहेत.
महिनाभरात 17 जणांचा अपघाती मृत्यू
भरधाव डंपरच्या धडकेत संगणक अभियंता दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात 19 जून रोजी घडली. मे महिन्यात लोहगाव परिसरात महाविद्यालयीन दुचाकीस्वार युवतीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली.