पुणे

सिंहगडावर प्राचीन काळात होता मानवाचा अधिवास

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर प्राचीन काळात मानवाचा अधिवास असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे सुरक्षा कवच म्हणून ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्याच्या वैभवात या संशोधनामुळे भर पडणार आहे. खडकवासला येथील पुरातत्व अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांनी सिंहगड परिसरात केलेल्या संशोधनातून प्राचीन काळातील पाऊलखुणा उजेडात आणल्या आहेत. गडावरील पाण्याची खांबटाकी तसेच जवळील एका लेणीच्या अभ्यासातून सातवाहन काळातील मानवाच्या अधिवासाच्या पाऊलखुणा सापडल्या असल्याचे मत डॉ. मते यांनी व्यक्त केले.

गडावरील देवटाके, तानाजी कड्याच्या परिसरात, कोंढणपूर, रांजे गावाच्या परिसरातील डोंगररांगेत खडकाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळात मानवाने कोरलेली काही रेखाटने सापडली आहेत. खडकांवरील रेखाटनांमध्ये व्होल्व्हा (शिवपिंडसदृश आकृती), कप मार्क केंद्रित वर्तुळे, शेपटी असलेले कप आदीमुळे मानवी उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा निदर्शनास आला असल्याचे डॉ. मते यांनी सांगितले. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागप्रमुख डॉ. पी. डी.साबळे व पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी या स्थळांची पाहणी केली.

खडकावर कोरलेली शिल्प राज्यात अनेक ठिकाणी आढळतात. दख्खनच्या पठारावरील प्राचीन व्यापारी मार्गाच्या आसपास बेसॉल्ट खडकावर अशा आकृत्या कोरण्यासाठी टोकदार दगडी हत्यारांचा वापर केला आहे. या काळात मानवाने आपल्या मनातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी ही रेखाटने कोरली असावीत.

                                                   – डॉ. पी. डी. साबळे,
                                     पुरातत्व विभागप्रमुख, डेक्कन कॉलेज

इसवीसन पूर्व दुसर्‍या शतकापर्यंतच्या या पाऊलखुणा आहेत. सिंहगडाचे बांधकाम होण्याच्या अगोदर येथे मानवाचा वावर असावा, हे यावरून सिद्ध होत आहे.

                                          – डॉ. नंदकिशोर मते,
                                            पुरातत्व अभ्यासक

SCROLL FOR NEXT