खडकवासला : सिंहगड किल्ल्यावर वाहनाने येणाऱ्या पर्यटकांकडून रविवारी (दि.8) दिवसभरात वनविभागाच्या वतीने 80 हजार 150 रुपयांचा उपद्रव शुल्क जमा करण्यात आला. सुट्टीच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सिंहगड, राजगडसह खडकवासला, पानशेत आदी पर्यटन स्थळांकडे धाव घेतली.
किल्ले सिंहगडावर वनविभागाच्या वतीने गोळेवाडी नाका, कोंढणपूर फाटा येथे वनविभागाचे सुरक्षा रक्षकांनी थांबून योग्य वाहतूक नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दीतून सुटका झाली. सिंहगडाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर, नितीन गोळे आदींसह सुरक्षारक्षक तैनात होते.
रविवारी दिवसभरात गडावर पर्यटकांची दुचाकी 835 व चारचाकी 382 वाहने गेली. दुपारी पर्यटकांची संख्या वाढली. त्यामुळे घाट रस्त्यावर काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. गडावरून खाली येणाऱ्या वाहनांच्या प्रमाणात वाहने गडावर सोडण्यात आली.