पुढारी ऑनलाईन डेस्क : अनाथांच्या माई अशी ओळख असणार्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी काल रात्री ८ वाजता पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महानूभव पंथाप्रमाणे पुण्यातील ठोसर बागेत त्यांचा दफनविधी होत आहे. मानवंदनेसाठी महिला पोलिसांचे पथक बोलविण्यात आले होते.
सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. नातेवाईकांसह मान्यवर माईंच्या अंतिम दर्शनासाठी आले होते.
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. आई-बाबांना साठे दाम्पत्याला नको असताना पोटी म्हणजेच मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताईंच नाव चिंधी ठेवले होते. हीच चिंधी हजारो अनाथांची आई झाली. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची त्यांची स्थापना केली. बाल निकेतन हडपसर (पुणे), सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा), अभिमान बाल भवन (वर्धा), सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था (पुणे), ममता बाल सदन (सासवड), गोपिका गाईरक्षण केंद्र (वर्धा) आदी संस्था त्यांनी सुरु केल्या. चिंधी ते अनाथांची आई त्यांचा हा खडतर प्रवास एका चित्रपटाच्या कथेसारखाच होता. त्यांच कार्यकर्तृत्व पाहता आतापर्यंत त्यांना ७५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.