पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : रांजणी येथील चिमटावस्तीत बुधवारी (दि. 10) सकाळी साडेआठच्या सुमारास दोन बछड्यांसह बिबट मादीचे दर्शन शेतकर्यांना झाले. दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मंचर रस्त्यावर ही बिबट मादी व तिचे बछडे दिसले. रांजणीतील कारफाट्यानजीक चिमटावस्ती आहे.
येथे गेले तीन महिन्यांपासून शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. बुधवारी (दि. 10) सकाळी शेतकरी जालिंदर जाधव हे पत्नी हिराबाई व इतर महिलांसह शेतात भुईमूग खुरपणीसाठी निघाले असता, त्यांना कडवळाच्या शेतात दोन बछडे दिसले. त्या वेळेस त्यांनी आरडाओरडा केला, तर त्या बछड्यांच्या पुढे पन्नास फुटांवर बिबट मादीही दिसून आली. या वेळी मंचरकडे ये-जा करणार्या अनेक नागरिकांनीही बछड्यांना व मादीला पाहिले.
गेल्या तीन महिन्यांपासून चिमटावस्तीत बिबट्याचा वावर आहे.अनेकदा शेतात पाणी देण्याच्या वेळेस बिबट्याचे दर्शन होत आहे. मागील आठवड्यात बिबट्या आमच्या गोठ्याबाहेर उभा होता; परंतु जाळी असल्याने त्याला वासरांवर हल्ला करता आला नाही, असे शेतकरी पंढरीनाथ जाधव यांनी सांगितले. वनविभागाने चिमटावस्तीत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात व स्थानिक शेतकर्यांनी केली आहे.