पुणे

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील रस्त्यांची चाळण

अमृता चौगुले

टाकवे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील आंदर मावळ व नाणे मावळ भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी अशा आजारांच्या तक्रारी वाढताना पाहायला मिळत आहे.

आंदर मावळ व नाणे मावळ हा भाग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या भागामध्ये सुमारे 90 ते 100 गावे छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्या आहेत. मावळमधील शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय असला तरी त्याबरोबर कुक्कुटपालनाचे, फूल उत्पादनाचे व्यवसाय विस्तारले आहेत. आंदर मावळ भाग 60 ते 70 व नाणे मावळ भाग 50 ते 60 किलोमीटर विस्तारला आहे.
जागोजागी खड्डे

यामध्ये नाणे मावळमधील कचरेवाडी, साई, वाउंड, पारवडी, उकसान, उंबरवाडी, करंजगाव आदी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर आंदर मावळमधील कशाळ, भोयरे, किवळे, इंगळून, पिंपरी, माळेगाव, सावळा, खांडी, कुसूर, कांब्रे, माऊ, दवणेवाडी, फळणे, टाकवे बुद्रुक आदी गावांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत.

या रस्त्यांची कामे अनेक वेळा झाली. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने तीन ते चार महिन्यांमध्ये रस्त्याला केलेली डागडुजी किंवा डांबरीकरण पूर्णपणे निघून जात आहे. पुन्हा दोन ते तीन महिन्यांत रस्त्यांवर खड्डे पडत आहेत.

                                              – संतोष वसंत असवले, सामाजिक कार्यकर्ते

या भागात काही ठिकाणी दळणवळणाचे प्रमाण कमी जास्त असले तरी येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे. मात्र, प्रशासन याकडे जाणूनबुजून काणाडोळा करीत आहे. यातील काही रस्ते पीडब्ल्यूडी तर काही रस्ते पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे असतात. परंतु, सद्यःस्थितीत दोन्ही विभागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे.
                                                  – गणेश गुरव, अध्यक्ष, सेवा फाउंडेशन

दरवर्षी कोट्यवधी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर होत असतात. परंतु, हे सर्व पैसे शेवटी खड्ड्यातच जातात. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यांची अक्षरशः चाळण होते. अशा रस्त्यांवरून वाहने कशी चालवायची? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे. अनेक वेळा मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची होणे गरजेचे आहे.
                                                               – सुदाम तुर्डे, वाहनचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT