बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांच्या कामांसंबंधी नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. शहरातील बहुतांश सर्वच भागांतील रस्त्यांची वाट लागल्याची स्थिती आहे. सुस्थितीत रस्ता असणारा परिसर अपवादानेच बघायला मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील भिगवण चौकापासून ते सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, नेवसे रोड, दुर्गा टॉकीजसमोरील रस्ता, तारा टॉकीजसमोरील रस्ता, पूनावाला गार्डन ते वसंतनगरकडे जाणारा रस्ता, कचेरी रोडपासून सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, सांस्कृतिक भवन ते मार्केट यार्डकडे जाणारा रस्ता, यांसह अन्य अनेक रस्त्यांची कमालीची दुरवस्था झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या स्थितीतून वाहनचालक वाहने हाकत आहेत. त्यांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नेवसे रस्त्यावर अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. येथील रस्ताकामासाठी उकरल्यानंतर तो पुन्हा केला गेला नाही. परिणामी, धुळीचे लोट दुकानात शिरतात. व्यावसायिक कमालीचे हैराण झाले आहेत. हीच परिस्थिती दुर्गा टॉकीजसमोरील रस्त्याची आहे. या रस्त्याचे काम जलवाहिनी टाकायची राहिल्याने झालेले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेकडे कोठे जलवाहिनी टाकली जाणार आहे, याची विचारणाही केली. हे काम जीवन प्राधिकरण करणार आहे. परंतु, शासकीय विभागांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. रिंगरोडची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. तेथील दुरुस्तीकडेही लक्ष दिले जात नसल्याची स्थिती आहे.
नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. नागरिकांना आपल्या प्रभागातील नगरसेवकाला किमान या अडचणी मांडता येत होत्या. सध्या नागरिकांच्या हाती तेही राहिलेले नाही. दरम्यान, याप्रश्नी माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक महेश रोकडे यांना निवेदन देत शहरातील रस्त्यांचे त्वरित सर्वेक्षण करीत प्राधान्याने कामे करावीत, अशी मागणी केली आहे.