वाडा: सह्याद्रीच्या कुशीत, पांडवकालीन लेण्यामध्ये वसलेले वाडा (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र गडदूदेवी देवस्थान हे नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. डोंगररांगेत अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्ग खुलून दिसत असून, मंदिराशेजारील फेसाळणारे धबधबे आणि रमणीय परिसरामुळे येथे येणाऱ्या भक्तांना अद्भुत अनुभव लाभत आहे.
वाडा गावाच्या उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर डोंगरकपारीत वसलेले हे देवस्थान स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण मानले जाते. मंदिर परिसरात मरिआई, कळमजाई, राणूबाई आदी देवींचीही मंदिरे असून, या परिसराला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. (Latest Pune News)
भीमा, भामा व आरळा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या गावाला ‘वायू क्षेत्र’ म्हणून ओळख आहे. गडदूदेवी व कळमजाई या स्वयंभू मूर्ती असून, शंकर पिंड, नंदी, वाघ आणि म्हसोबा यांसह विविध दगडी मूर्ती परिसरात प्रतिष्ठापित आहेत.
शेजारील गुहेत वरसुबाई व काळुबाई तर साडेतीन शक्तिपीठ, विठ्ठल-रुक्मिणी, प्रभुराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व संतोषीमाता यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात दरवर्षी हजारो भाविक येथे येऊन धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. यावर्षी मंदिरालगत मोठा आर.सी.सी. सभामंडप उभारण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष काळुराम सुपे यांनी दिली.