पुणे

मोरगाव : खा. श्रीकांत शिंदे यांनी घेतले मयूरेश्वर, खंडोबाचे दर्शन

अमृता चौगुले

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा : अष्टविनायकाचे आद्य तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे खासदार श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, गणेश योगिनी संध्याताई अमृते (डोंबवली) यांनी श्री मयूरेश्वरास मंत्रोच्चारात ग्रामजोशी किशोर वाघ, विजय ढेरे, मंदार वाघ यांच्यामार्फत अभिषेक केला. अभिषेकापूर्वी या सर्व मान्यवरांनी श्री क्षेत्र नग्न भैरवाचे दर्शन घेतले. तदनंतर मयूरेश्वर मंदिरात मंत्रोच्चारात अभिषेकानंतर मयूरेश्वर देवस्थानाचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी खा. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व गणेश योगिनी संध्याताई अमृते यांचा शाल-श्रीफळ व प्रतिमा देऊन सन्मान केला

मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात उपसरपंच निलेश केदारी व माजी सरपंच पोपटराव तावरे यांनी या सर्वांचा सन्मान केला. मोरगाव ग्रामपंचायतीमार्फत उपसरपंच नीलेश केदारी यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाच किलोमीटर एक फुटी जलवाहिनी मोरगाव अंतर्गत वाड्यावर, पाच किलोमीटर सिमेंटचे रस्ते व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे दर कमी करणे बाबतचे निवेदन या वेळी दिल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी (दि. 4) महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. शिंदे यांचा देवदर्शनासाठीचा हा खासगी दौरा होता. सकाळी ते हेलिकॉप्टरने जेजुरीत आले. या वेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के, शिवसेना जेजुरी शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले.

जेजुरी गडावर ऐतिहासिक तलवार उचलून खासदार श्रीकांत शिंदे यांनी साहस दाखविले. देवसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, बाळासाहेब खोमणे, गणेश डिखळे यांनी खासदार शिंदे यांचा श्री खंडोबा देवाची प्रतिमा देऊन सन्मान केला. सिमेंट रस्ता व पुरंदर उपसा सिंचनचा ग्रामपंचायत स्तरावर आराखडा तयार करावा, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

पुरंदर सिंचन उपसा योजनेबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले की, मागच्या सरकारने याचा दर 3.79 रुपये ठेवलेला होता. तो दर 1.16 रुपये म्हणजे तिपटीने कमी करण्यात आला. राज्यसरकारने केले तरी याबाबत ऊर्जा खाते व जलसंपदा यांच्यामार्फत कार्यवाही होते त्याच्यामध्ये येणा-या डिफरन्समुळे लाभार्थी नाराज होतात.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना सांगितले आहे. जी. आर. काढलेला आहे. शेतकरी नाराज होणार नाहीत यासाठी प्रयत्न केले जातील. या वेळी विविध पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, विजय शेडकर, वसंत वाघुले, राहुल भाग्यवंत व अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

SCROLL FOR NEXT