पुणे : श्री कसबा गणपती मंदिराची रचना पाहिली, तर त्यात सभामंडप म्हणजेच अंतराळ आणि गर्भगृह आहे. शिवकालीन सभामंडप पूर्णपणे यादवकालीन शैलीत केलेले आहे. बाह्यभाग पूर्णपणे लाकडाचा आहे. मंदिरातील सुंदर कमानी पाहिल्या, तर त्यामध्ये केळ फुलाची मराठा शैलीतील कमान रेखीव कोरलेली दिसते. आतील भागात स्तंभांवर उलट नाग दिसतात आणि आत गणरायाची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते, अशी माहिती देत इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यानी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुणेकरांसमोर उलगडली.(Latest Pune News) ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दीपावली उत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने दीपावली उत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि पुरातन मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा इतिहास याविषयावर अमोघ वैद्य यांचे व्याख्यान झाले.
वैद्य म्हणाले, मुरार जगदेवाने पुण्यावर आक्रमण केले आणि पुणे बेचिराख झाले. त्या वेळी पुण्याचे ग्रामदैवत उभे होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना ग्रामदेवतेने जणू बोलावले. यादव शैलीत त्यांनी मंदिर पुन्हा उभे केले. आताचा जो भाग आपल्याला दिसतो, तो पेशवेकाळात जोडला गेला.