पुणे

शिरूर : नवसाला पावणारे श्री रामलिंग देवस्थान

अमृता चौगुले

अभिजित आंबेकर

शिरूर(पुणे) : श्री रामलिंग देवस्थान नवसाला पावणारे आहे. येथे दर रविवारी, सोमवारी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. प्रभू रामचंद्रांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याने त्यास रामलिंग असे म्हटले जाते. यादवांचे 5 वे राजे भिल्लमदेव यांनी हे शिव मंदिर 12 व्या शतकात बांधले. हेमाडपंती पध्दतीच्या या मंदिराच्या पुढे 9 खनी दगडी सभामंडप, छोटा नंदी होता. पेशवे काळात शके 1694 मध्ये गिरीसुताने या शिव मंदिराचा जीर्णोद्वार केला. तेव्हा मंदिराला सुंदर कळस, मोठा नंदी, उत्तरेकडील प्रवेशद्वार व मंदिरासभोवती मातीच्या भिंती, ओवरी बांधण्यात आली.

इ. स. 1952 साली तहसीलदार शिवरामपंत कुलकर्णी यांनी मंदिराभोवताली बांधलेल्या मातीच्या भिंती पाडून शिरूर पंचक्रोशीतील गावकर्‍यांच्या मदतीने दगडी भिंती बांधल्या. पुढे दानशूर उद्योगपती स्व. रसिकभाऊ माणिकचंद धारिवाल यांनी 1974 साली श्री रामलिंग मंदिर जीर्णोद्वार व समाजविकास मंडळ स्थापन करून महाशिवरात्रीस यात्रा भरविली. स्वःनिधीतून अनेक विकासकामे केली. मंदिराचा जीर्णोध्दार करून परिसराचा कायापालट केला. देवस्थानला 'क' वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. श्रावण महिन्यात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी येथे होते. दर्शनासाठी भाविकांची रांग लागते.

महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसांची यात्रा भरते. अखंड हरिनाम सप्ताह व पंचक्रोशीच्या वतीने अन्नदान होते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी घोड नदीच्या शिवसेवा मंदिरातून श्री रामलिंगाची प्रतिमा ठेवलेली पालखी दुपारी निघते. त्यानंतर शाही मिरवणूक पहाटे स्व. रसिकभाऊ धारिवाल यांच्या निवासस्थानासमोर येते. तेथे रसिकभाऊ धारिवाल पालखीची पूजा करीत असत. आज ती परंपरा त्यांचे पुत्र प्रकाशशेठ धारिवाल चालवत आहेत. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे प्रकाशशेठ धारिवाल अध्यक्ष आहेत.

महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भव्यदिव्य पालखी मिरवणूक निघते. शिवरात्रीला दिवसभर भाविकांची रांग लागते. तिसर्‍या दिवशी बैलगाडा शर्यती होतात. श्री रामलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी दर रविवारी, सोमवारी भाविक येत असतात. अनेक मान्यवरांनी रामलिंगाचे दर्शन घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांसह अनेक मान्यवर राजकीय नेत्यांनी तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी रामलिंगाचे दर्शन घेतले आहे.

श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान कसे याल?

1) पुणे घोडनदी 65 किमीमार्गे रामलिंग 3 किमी
2) नगर घोडनदी 55 किमीमार्गे रामलिंग 3 किमी
3) राजगुरूनगर पाबळमार्गे 55 किमी रामलिंग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT