पुण्यात अनेक जुनी देवीची मंदिरे आहेत, त्यातीलच एक म्हणजे शिवाजीनगर येथील श्रीभवानीमाता मंदिर. पेशव्यांच्या काळात अनेक मंदिराची उभारणी झाली. त्यापैकीच एक म्हणजे शिवाजीनगर भागातील श्रीभवानीमातेचे मंदिर आहे. आदिशक्तीचे एक रूप असलेल्या ही माता नवसाला पावते असे म्हटले जाते. येथील नवरात्रोत्सवही मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.
हे श्रीभवानीमातेचे मंदिर पेशवेकालीन आहे. मातेची मूर्ती स्वयंभू आहे आणि चतुर्भुज आहे. मातेने एका हातामध्ये त्रिशूळ, तर एका हातामध्ये डमरू धरले आहे. एका हातामध्ये फूल आहे तर एका हाताने माता भक्तांना आशीर्वाद देत आहे. मंदिराची रचना सुबक आणि पूर्वाभिमुख आहे. 12 जुलै 1961 च्या प्रलयाच्या वेळी मंदिर वाहून गेले. परंतु मातेची स्वयंभू रूपातील मूर्ती जागीच घट्ट उभी राहिली होती. अशा या श्रीभवानीमातेच्या शक्तीची आज अनेक जणांना प्रचिती आली आहे. 2007 साली मंदिराचा तिसर्यांदा जीर्णोद्धार झाला. तसेच, मार्च 2020 मध्ये मातेचा वज—लेप करण्यात आला आहे. मातेची पूजाअर्चा करण्याचे काम मंदिराचे पुजारी शंकर चव्हाण हे करीत आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात दीपोत्सव केला जातो. मकरसंक्रांतीला महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, तिळगूळ कार्यक्रम आयोजित केले जाते. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला मंदिरात छोटे - छोटे उत्सव साजरे होतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला अनेक भाविक मातेला नैवेद्य दाखवतात. शारदीय नवरात्रोत्सव हा मातेचा मोठा उत्सव असतो. अष्टमीला मंदिरात होम-हवन केले जाते आणि कोजागरी पौर्णिमेला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
नवरात्रोत्सवात मंदिरात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाविक दर्शनासाठी गर्दी करत असून, धार्मिक कार्यक्रमात भाविकही उत्साहाने सहभागी होत आहे. मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धास्थान असून, मातेकडे भाविक सुख - समृद्धी, भरभराटीची कामना करतात.रोहिणी चव्हाण, श्रीभवानीमाता मंदिर (शिवाजीनगर)