पुणे: समाविष्ट गावांमधील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेचे नायडू सांसर्गिक रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालयांसह 21 प्रसूतिगृहे आणि 51 दवाखाने कार्यरत आहेत. मात्र, डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णालयांमधील वर्ग ‘अ’ च्या 144 मंजूर पदांपैकी 105 पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये न्यूरोसर्जन (1), न्यूरोफिजिशियन (1), यूरोसर्जन (1), कार्डिओलॉजिस्ट (1), चेस्ट फिजिशियन (3), आयसीयू फिजिशियन (4), इनटेन्सिव्हिस्ट (3), स्त्रीरोगतज्ज्ञ (8), बालरोगतज्ज्ञ (4), क्ष-किरणतज्ज्ञ (16), पेडिअॅट्रिक सर्जन (4), मानसोपचारतज्ज्ञ (2), त्वचारोगतज्ज्ञ (1) आदी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्ण स्पेशालिटी उपचारांपासून वंचित राहात आहेत. (Latest Pune News)
महापालिकेमध्ये समाविष्ट गावे आल्यानंतर लोकसंख्येचा भार वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत रुग्णालयांमधील मनुष्यबळ वाढलेले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ग ’1’ मधील 72 टक्के पदे, वर्ग ’2’ मधील 70 टक्के आणि वर्ग ’3’ मधील 69 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
कमला नेहरू रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि विद्यार्थी आरोग्य सेवेसाठी हजर असले तरी त्यांच्याकडून एकहाती जबाबदारी उचलली जात नसल्याची तक्रार रुग्णालयातील डॉक्टरांकडून ऐकायला मिळत आहे. इतर रुग्णालयांमध्ये मोजकेच डॉक्टर अनेक रुग्णांची जबाबदारी सांभाळत आहेत. परिणामी, उपलब्ध डॉक्टरांवर ताण वाढला आहे आणि रुग्णांच्या समस्यांकडे आवश्यक त्या गांभीर्याने लक्ष देणे कठीण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेणे स्वस्त आणि सोयीचे असते. पण, डॉक्टरच वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांकडे पावले वळवावी लागत आहेत. सध्या तरी महापालिकेकडून रिक्त पदांवर कंत्राटी आधारावर मनुष्यबळ नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, दीर्घकालीन उपाय म्हणून नियमित भरती आणि आरोग्य सेवांचे सक्षमीकरण गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.