पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी 3 महिन्यांच्या मुदतीमध्ये केवळ 1 हजार 573 नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्या आकडेवारीवरून बहुतांश अनधिकृत नळजोडधारकांनी फुकटचे पाणी वापरण्यास पसंती दिल्याचे उघड होत आहे. यावरून पालिकेच्या अभय योजनेस अल्पप्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. शहरात 5 लाख 75 हजार मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. त्या तुलनेत नळजोडधारकांची संख्या कमी आहे. अनधिकृतपणे व चोरून नळजोड घेऊन पाणी वापरणार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण 35 ते 40 टक्के इतके आहे.
ही गळती रोखण्यासाठी पालिकेने दंड भरून निवासी व बिगरनिवासी अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी 3 महिने कालावधीत क्षेत्रीय कार्यालयानिहाय अर्ज मागविले होते. त्या अभय योजनेला नागरिकांनी अल्पप्रतिसाद दिला आहे.
एक जून ते 30 ऑगस्ट 2022 असे तीन महिन्यांसाठी ही विशेष अभय योजना राबविण्यात आली. निवासी नळजोडधारकांकडून केवळ अनामत रक्कम आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात आले. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. तर, झोपडपट्टीतील नळजोडधारकांना नाममात्र शुल्क आकारले होते. तरीही या योजनेला अल्पप्रतिसाद मिळाला.
निवासी भागातून 770 आणि झोपडपट्टी भागातून 803 असे 1 हजार 573 जणांचे अर्ज आले आहेत. ह क्षेत्रीय कार्यालयात झोपडपट्टी भागांतून सर्वांधिक 565 अर्ज आले आहेत. तर, निवासी भागातून ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वांधिक 299 अर्ज आहेत. त्यातील 1 हजार 129 अर्ज निकाली काढले आहेत. उर्वरित 444 अर्ज प्रलंबित आहेत, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले
क्षेत्रीय कार्यालयानुसार आलेले अर्ज
क्षेत्रीय कार्यालय अर्जांची संख्या
अ 78
ब 299
क 220
ड 101
ई 82
फ 119
ग 86
ह 588
एकूण 1,573
अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी कारवाई करणार
अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी मुदतीमध्ये अर्ज न केलेल्यांचा शोध घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे विशेष सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या नागरिकांचे नळजोड खंडित केले जाणार आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तसेच, थेट नळजोडास विद्युत मोटार लावण्याचे मोटार जप्त केले जाणार आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.