पुणे

Short hand exam : शॉर्ट हँडची परीक्षा आता ऑनलाइनच; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

अमृता चौगुले

पुणे : राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार्‍या विविध परीक्षांपैकी एक असलेली शॉर्ट हँड परीक्षा येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाउन स्वरूपात घेण्यात येणार आहे. सध्या ही परीक्षा ऑफलाइन घेतली जात असून, यामध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे केवळ प्रमाणपत्रेच वाटण्याच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेतील अधिकार्‍यांनी दिली.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट हँड परीक्षा अर्थात लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून सरकारी तसेच खासगी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे संबंधित परीक्षेचे प्रमाणपत्र नोकरीसाठी अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे आणि संबंधित परीक्षा ऑफलाइन होत असल्यामुळे त्यामध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. परीक्षा परिषद साधारण वर्षातून दोनदा ही परीक्षा आयोजित करते. या परीक्षेला 15 ते 20 हजार उमेदवार नोंदणी करतात.

त्यामुळे योग्य पात्र उमेदवारांनाच प्रमाणपत्र मिळावे, परीक्षेचा निकाल पारदर्शक लागावा, यासाठी संबंधित परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणारी परीक्षा ही शेवटची ऑफलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर मात्र एप्रिल महिन्यापासून संबंधित परीक्षा ऑनलाइनच होणार आहे. त्यासाठीचा नवीन अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, यावर परीक्षा परिषदेने काम सुरू केले आहे.

खडखडाट कधी बंद होणार?

राज्य परीक्षा परिषदेकडून मराठी, इंग्रजी 30 आणि 40 शब्द प्रतिमिनीट परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा गेली अनेक वर्षे ऑफलाइन पध्दतीनेच घेण्यात येत आहेत. परंतु, आता सगळीकडे संगणकावर टायपिंग केले जात आहे. परीक्षा परीषदेकडून संगणक तसेच मशिनवरील अशा दोन्ही परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यातील मशिनवरील टायपिंग परीक्षेच्या प्रमाणपत्रात आजही गैरप्रकार होत असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. सरकारनेदेखील मशिनवरील टायपिंग परीक्षा बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, संस्थाचालकांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सर्व परीक्षा ऑनलाइन होत असतानाच आता मशिनचा खडखडाट बंद करून टायपिंगच्या परीक्षा केवळ ऑनलाइन पध्दतीनेच घेतल्या जाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहोत. त्यातूनच येत्या काळात शॉर्ट हँड परीक्षा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून संबंधित परीक्षा ऑनलाइनच घेण्यात येणार आहे.

– डॉ. नंदकुमार बेडसे,
अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद

हेही वाचा

SCROLL FOR NEXT