बैलविक्री व्यवहारातून फलटणमधील एकावर गोळीबार Pudhari File Photo
पुणे

निंबुत येथे बैलविक्री व्यवहारातून फलटणमधील एकावर गोळीबार

सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षासह दोघांना अटक : चौघे फरारी

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बैलगाडा शर्यतीचा बैल खरेदी व्यवहारातून निंबुत (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात रणजित निंबाळकर (मूळ रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. स्वामी विवेकानंदनगर, फलटण, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गोळी लागली असून पुण्यातील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, त्यांचा मुलगा गौरव यांना अटक केली आहे. काकडे यांचा दुसरा मुलगा गौतमसह चौघे फरार आहेत. सहा जणांवर गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जखमी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, रणजित यांनी गौतम काकडे यांच्याकडून गतवर्षी सर्जा नावाचा बैल विकत घेतला होता. आता रणजित यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम यांनी 37 लाख रुपयांना घेतला. त्यापैकी 5 लाख रुपये गौतमने रणजितला दिले होते. गुरुवारी उर्वरित रक्कम नेण्यासाठी त्यांना निंबुत येथे बोलावले होते. बैल खरेदी केला त्याच दिवशी काकडे यांनी तो खटाव तालुक्यातील बुध येथून निंबुतला नेला आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता रणजित निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडेंकडे आले होते. त्यावेळी राहिलेले पैसे न देता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा, असे काकडे म्हणत होते. तर पैसे मिळाल्याशिवाय सही करणार नाही, असे सांगून आल्याचे रणजित यांनी पत्नी अंकिता यांना सांगितले होते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रणजित, पत्नी अंकिता, त्यांची दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातलग वैभव भारत कदम, पिंटू प्रकाश जाधव हे लोणंद येथे आले. तेथे तोडकर यांनी निंबाळकर यांना, काकडे हे तुम्हाला सगळे पैसे दिल्याचे सांगत आहेत, मग तुम्ही सही का करत नाही अशी विचारणा केली. त्यावर सर्व रक्कम मिळाली नसल्याचे सांगत निंबाळकर निंबुतला आले. तेथे गौतम यांनी, सकाळी पैसे देतो. आता स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. तर रणजित यांनी, उरलेले पैसे द्या, सही करतो. अन्यथा पाच लाख रुपये परत करतो, माझा बैल मला द्या,’ असे सांगितले. त्यावेळी गौतम यांनी ’तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो’, असे म्हणत काही युवका व भाऊ गौरवला बोलाविले. ते आल्यानंतर वाद होऊन गौरवने पिस्तुलामधून रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली. जखमी रणजित यांना तत्काळ वाघळवाडीतून बारामतीतील खासगी रुग्णालय व तेथून पुण्याला उपचारासाठी हलविले. फरारी गौतम काकडे याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गौतम याचा बैलगाडा राज्यात प्रसिद्ध आहे. त्याच्या बैलगाड्याने यापूर्वी ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT