Pune Politics: पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय शिवतारे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे संभाजी झेंडे हे महायुतीचे उमेदवार नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. स्वतःला महायुतीचे उमेदवार संबोधणार्या संभाजी झेंडे यांना याचा धक्का बसला आहे.
पुरंदर-हवेलीत शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी खेचून आणली. झेंडे यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर शिवतारे, झेंडे आणि जगताप, असा तिहेरी सामना रंगला होता. त्यामुळे महायुतीचा नेमका उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने शिवसेना हा आपला नैसर्गिक मित्र असल्याने शिवसेनेसोबतच जाणे पसंत केले. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आणि राष्ट्रीय महासचिव यांनी तशी घोषणाही केली. मात्र, संभाजी झेंडे यांच्या प्रचार साहित्यावर मोदी, फडणवीस आणि शिंदे यांचे फोटो तसेच होते. काँग्रेसनेही एखाद् दुसरा भाजप कार्यकर्ता हाताशी धरून शिवतारे यांच्यावर तोफा डागत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, झेंडे यांच्यासह भाजपच्या असंतुष्टांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कृतीने स्पष्ट इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवतारे यांच्या नावावरच मोहोर उमटविताना मोदींनी शिवतारे यांना आशीर्वादही दिले. विजय शिवतारे हेच अधिकृत उमेदवार असल्याने आता शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते ताकदीने मैदानात उतरले आहेत.