पुणे: शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिना निमित्त शनिवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले पूर्णाकृती भव्य अश्वारुढ स्मारक व शिवराज्याभिषेक शिल्पासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे.
गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत असताना या दिवसाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाची मान्यता घेऊन शिवस्वराज्य दिन महाराष्ट्र व्यापी बनवला.
२०२१ सालापासुन अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास खात्याने तसेच उच्च व तंत्र खात्याने शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये ६ जून हा दिवस “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यास सुरुवात केली.
आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्यगुढी उभारुन साजरा केला जात आहे. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. यावर्षी देखील विविध ठिकाणी स्वराज्यध्वज व स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, समीर जाधवराव, निलेश जेधे, शंकर कडू, किरण साळी, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार,मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.