पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मिळकत हस्तांतरणासाठी खरेदीच्या किमतीवर अर्धा टक्के शुल्क आकारले जाते. ही रक्कम पूर्वीपेक्षा तब्बल वीसपट अधिक आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. या शुल्कांची रक्कम पूर्वीप्रमाणे करयोग्य मूल्याच्या 5 टक्के इतकी करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.
शहरात 31 मार्च 2022 नंतर मिळकत खरेदी केल्यास ती मिळकतकर संकलन विभागाकडे नोंदणी करण्यासाठी खरेदी रकमेवर अर्धा टक्का शुल्क भरावे लागत आहे. हा नागरिकांवर मोठा भुर्दंड पडत आहे. या निर्णयाचा फेरविचार करून शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे करयोग्य मूल्याच्या 5 टक्काप्रमाणे आकारणी करून दिलासा द्यावा. पूर्वी मिळकत हस्तांतरण करताना 2 हजार रुपयंपर्यंत शुल्क भरावा लागत होता. मात्र, 31 मार्च 2022 नंतर ही रक्कम जवळजवळ वीसपटीने वाढली आहे.
काही नागरिकांनी 31 मार्च 2022 पूर्वी मिळकत खरेदी केली. त्यांना केवळ अर्ज केला नाही, म्हणून अर्धा टक्का रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिक व त्यांची मुले परदेशात असल्याने त्यांच्याकडून नजरचुकीने पालिकेच्या जाहिरातीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे. वरील हस्तांतरण शुल्क 31 मार्च 2022 पूर्वी हस्तांतर केलेल्या नागरिकांना लागू करू नये. त्यांना पूर्वीप्रमाणे जुन्या नियमानुसार हस्तांतरण शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.